कुवेतमध्ये बुधवारी सकाळी एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून 41 जणांचा मृत्यू झाला. 30 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 40 भारतीय आहेत. कुवेतमधील भारतीय दूतावासाने आगीच्या या दुर्घटनेत 30 भारतीय मजूर जखमी झाल्याची माहिती दिली आहे. स्थानिक वेळेनुसार, सकाळी 6 च्या सुमारास कुवेतच्या मंगाफ शहरात ही घटना घडली. रॉयटर्सच्या हवाल्याने एका वरिष्ठ पोलीस कमांडरने स्टेट टीव्हीला सांगितलं की, “ज्या इमारतीला आग लागली, तिथे कामगारांच्या निवासाची व्यवस्था केली जायची. मोठ्या संख्येने कामगार इथे राहत होते” कुवेतच्या दक्षिणी अहमदी प्रांतामधील मंगाफ येथे सहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या किचनमध्ये आग भडकली. अधिकाऱ्यांनी आग का लागली? त्याच्या कारणांचा शोध सुरु केला आहे. या इमारतीत जवळपास 160 लोक राहत होते. एकाच कंपनीचे हे सर्व कर्मचारी होते.
“कुवेतमधील भारतीय दूतावासाने एक इमर्जन्सी हेल्पलाइन नंबर +965-65505246 सुरु केला आहे. सर्व संबंधितांना अपडेटसाठी हेल्पलाइनच्या संपर्कात राहण्याची विनंती केली आहे. दूतावास सर्व शक्य मदत करेल” असं कुवेतमधील भारतीय दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर काय म्हणाले?
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सुद्धा आगीच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. “आगीच्या या घटनेबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. 50 पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. अजून या संदर्भात काय माहिती मिळेतय त्याची प्रतिक्षा करत आहोत. ज्यांचा या आगीत मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा, यासाठी प्रार्थना करतो. आमच्या दूतावासाकडून सर्व संबंधितांना आवश्यक मदत मिळेल” असं एस जयशंकर यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
In connection with the tragic fire-accident involving Indian workers today, Embassy has put in place an emergency helpline number: +965-65505246.
All concerned are requested to connect over this helpline for updates. Embassy remains committed to render all possible assistance. https://t.co/RiXrv2oceo
— India in Kuwait (@indembkwt) June 12, 2024
कुवेतच्या मंत्र्याने काय आदेश दिले?
कुवेत टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कुवेतचे अंतर्गत मंत्री शेख फहाद अल-यूसुफ अल-सबाह यांनी पोलिसांना मंगाफ इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीच्या मालकाला सुद्धा अटक करण्याचे आदेश दिलेत. मंत्र्याने आग लागली, त्या भागाचा दौरा केला. “आज जे काही झालं, ते कंपनी आणि बिल्डिंग मालक यांच्या स्वार्थीपणाचा परिणाम आहे” असं कुवेतच्या मंत्र्याने म्हटलं आहे. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक पावल उचलण्याचे आदेश दिले आहेत.