जेरुसलेम : इस्रायली सैन्याने शुक्रवारी गाझा शहरात राहणाऱ्या हजारो लोकांना तेथून निघून जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. इस्रायलने या भागात कारवाईची तयारी केली आहे. इस्रायलने तीन लाख सैन्य तयार ठेवलं आहे. संयुक्त राष्ट्राने सांगितले की, उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या 11 लाख लोकांना 24 तासांच्या आत इस्रायलकडून बाहेर काढण्याचा इशारा मिळाला आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने शनिवारी इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. यानंतर इस्रायलकडून युद्धाची घोषणा करण्यात आली होती. इस्रायलच्या संरक्षण दलाने हमासच्या मुख्य ठिकाणांना लक्ष्य केले होते.
इस्रायल-हमास यांच्यातील संघर्षाचा आज सातवा दिवस आहे. इस्रायलचं लष्कर आता मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. गाझा शहरातील नागरिकांना दक्षिणेकडे जाण्यास सांगण्यात आले आहे. हमासचे दहशतवादी गाझा शहरात बंकरमध्ये लपून बसले आहेत. गाझा शहरातील यूएन पॅलेस्टिनी निर्वासित एजन्सीचे अधिकारी इनास हमदान म्हणाले, ‘संपूर्ण अराजकतेचे वातावरण आहे, काय करावे हे कोणालाच कळत नाही. गाझा शहर आणि उत्तर गाझामधील यूएनच्या सर्व कर्मचाऱ्यांना येथून बाहेर काढण्यात आले आहे.
इस्रायली सैन्याने गाझा शहरातील नागरिकांना सांगितले आहेत की, हे स्थलांतरण तुमच्या सुरक्षेसाठी आहे. याचा अर्थ इस्रायल मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. इस्रायली सैन्याकडून मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लष्कराने सांगितले की ते हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. मात्र याबाबत सध्या कोणताही निर्णय झालेला नाही. संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले की, इस्रायलने गाझाच्या लोकांना २४ तासांत दक्षिणेकडे जाण्यास सांगितले आहे.
इस्रायलने दावा केला आहे की, त्याच्या हद्दीत सुमारे 1,500 हमासचे अतिरेकी मारले गेले आहेत. इस्रायलचे ऊर्जा मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले की ट्रक गाझामध्ये प्रवेश करणार नाही.