भारतविरोधी वक्तव्य केल्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी आता तडजोडीची भूमिका स्वीकारली आहे. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. सुरुवातीपासून चीनकडे कल असणाऱ्या मोहम्मद मुइज्जू यांनी भारतविरोधी भूमिका घेतली. मालदीवमधील भारतीय सैन्याने 10 मे पर्यंत मायदेशी निघून जावं, अशी त्यांची मागणी होती. मात्र, आता अचानक मोहम्मद मुइज्जू यांची भूमिका बदलली आहे. भारत आमचा कायमच जवळचा सहकारी असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. मालदीवने भारताकडून कर्ज घेतलं आहे. त्या कर्जामध्ये सवलत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मागच्यावर्षीच्या अखेरपर्यंत भारताच मालदीववर 40 कोटी 9 लाख अमेरिकी डॉलरच कर्ज बाकी होतं. राष्ट्रपतीपद संभाळल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी स्थानिक मीडियाला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, भारताने मालदीवला मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सर्वाधिक संख्येने योजना लागू केल्या आहेत. भारतच मालदीवचा जवळचा सहकारी देश राहील. यात कुठलीही शंका नाही, असं मुइज्जू यांनी म्हटल्याच वृत्त मालदीवमधील एडिशन डॉट एमवी या वेबसाइटने दिलं आहे.
मुइज्जू यांची भूमिका अचानक कशी बदलली?
भारताने मागच्या काही वर्षात मालदीवला दोन हेलिकॉप्टर आणि एक डोर्नियर विमान भेट म्हणून दिलं. त्याशिवाय मालदीवला मानवी आणि वैद्यकीय मदत दिली. मालदीवच्या सरकारने भारताकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलय. त्यात दिलासा देण्याची मागणी मुइज्जू यांनी भारत सरकारकडे केली आहे. एप्रिलच्या मध्यावर मालदीवमध्ये संसदेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुइज्जू यांनी हे वक्तव्य केलय. मालदीवच्या आर्थिक क्षमतेनुसार, कर्ज फेडण्याचे पर्याय शोधण्यासाठी भारतासोबत चर्चा सुरु असल्याच त्यांनी सांगितलं.
मोदींसोबत झालेल्या भेटीत काय सांगितलं?
दुबईत डिसेंबर महिन्यात सीओपी 28 शिखर सम्मेलनाच्यावेळी मुइज्जू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा झाली होती. त्या बैठकीचा त्यांनी उल्लेख केला. “कुठलाही प्रकल्प रोखण्याचा माझा इरादा नाही, हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं. उलट प्रकल्पाच काम वेगात व्हाव अशी मी इच्छा व्यक्त केली” असं मुइज्जू म्हणाले. मालदीवमध्ये भारतीय सैन्याची उपस्थिती हा एकमेव वादाचा मुद्दा असल्याच त्यांनी सांगितलं. भारताने हे तथ्य स्वीकारल असून आपल्या सैनिकांना परत बोलवण्यासाठी सहमत आहे असं मुइज्जू म्हणाले.