हॅम्बर्ग : जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरासाठी आजचा दिवस अत्यंत वाईट ठरला आहे. हॅम्बर्ग येथील एका चर्चवर गोळीबार करण्यात आला आहे. काही अज्ञात बंदुकधारी आले आणि ते गोळीबार करत सुटले. या गोळीबारात एकूण सात नागरिक मारले गेले आहेत. तसेच इतर काही लोक जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार हा हल्ला ग्रॉस बोरस्टेल जिल्ह्यातील डीलबोगे स्ट्रीटवरील एका चर्चमध्ये झाला आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नाकाबंदी केली आहे. तसेच नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हल्ल्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही. याप्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.
उत्तर जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली आहे. या हल्लेखोरांचा हेतू काय होता हे स्पष्ट झाले नाही. त्याचाच पोलीस सोध घेत आहेत. मात्र अशा प्रकारचा हल्ला झाल्याचं पोलिसांनी ट्विट करून स्पष्ट केलं आहे. अल्स्टरडॉर्फ जिल्ह्यात पोलिसांनी एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. चर्चमध्ये गोळीबार झालाय, असं सांगण्यात आलं. पण पोलिसांनी या घटनेची अधिक माहिती दिलेली नाही. सध्या घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. चर्चमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं जात आहे.
या हल्ल्यानंतर पोलिसांनी चर्च परिसरातील सर्व रस्ते बंद केले आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. तसेच संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच हल्ला झाला त्या परिसरापासून लांब राहण्याचे आदेश नागरिकांना देण्यात आले आहेत. लोकांनी घरातच थांबण्याचे मेसेज पोलिसांकडून पाठवले जात आहे. गरज असेल तरच घरातील फोनचा वापर करा. अन्यथा करू नका. नेटवर्कवर अधिक लोड येऊ देऊ नका, असं पोलिसांनी नागरिकांना सांगितलं आहे.
कोणतीही व्यक्ती संशयास्पद दिसली. किंवा कुणाच्या संशयास्पद हालचाली दिसल्या तर तातडीने त्याची माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसेच पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळवले असून या फुटेजद्वारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू केलं आहे. चर्चे परिसरातील रस्त्यांवर नाकाबंदी करतानाच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचीही कसून तपासणी केली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत हल्लेखोरांना सोडणार नाही, असा इशाराच पोलिसांनी दिला आहे.