तंत्रज्ञान एका सेकंदात सारं जग ठप्प करु शकतं. याचा अनुभव पुन्हा एकदा जगाला आलाय. मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक बिघाडानंतर त्यावर अवलंबून असणारे सारे उद्योग ठप्प पडले. विमान उड्डाणं रद्द झाली, बँकिंग सेवा ठप्प. अनेक देशातले टीव्ही चॅनेल बंद. विमानतळांचा कारभार थांबला. स्टॉक एक्स्चेंज बंद झालं आणि रेल्वेसहीत अनेक सेवा विस्कळीत झाल्या. काही तासांच्या खोळंब्यात जगभरात अब्जावधींच्या नुकसानीचा अंदाज आहे. अमेरिकेपासून ब्रिटनपर्यंत., भारतापासून ऑस्ट्रेलियापर्यंत अनेक मोठमोठे व्यवसाय बंद पडले. मायक्रोसॉफ्टमधल्या तांत्रिक बिघाडामुळे भारतात इंडिगो, स्पाईसजेट, अकासा, एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांच्या सेवा बाधित झाल्या आहेत. तर जगात अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधल्या विमान उड्डाणांमध्येही अडचणी आल्या आहेत.
तांत्रिक बिघाडाच्या फटक्यामुळे अनेक विमानतळांवरचे टाईमटेबल दर्शवणारे इंडिकेटर बंद आहेत. परिणामी विमानतळांवर अशा पद्धतीने हातानं लिहून विमानांचं वेळापत्रक सांगितलं जातंय. विमानाची तिकीटं सुद्धा पेनानं तपासून प्रवाश्यांना आत सोडलं जातंय. एकाच तांत्रिक
बिघाडानं जवळपास जगातल्या अनेक देशांना पुन्हा कागद आणि फळ्यावर वेळापत्रक लिहण्याची वेळ आणलीय. मायक्रोसॉफ्टमध्ये बिघाड झाला तर जग कसं काय ठप्प होईल. असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यासाठी काय घडलं हे पाहण्याआधी पार्श्वभूमी समजून घेऊयात.
कोणतीही सेवा ढोबळमानानं ३ टप्प्यात विभागली जाते. समजा सेवा प्रदान करणारी कंपनी जर कम्युनिकेशन सॅटेलाईट असेल तर
तर त्या सेवेची देखभालीसाठी एक दुसरी यंत्रणा काम करते आणि तिसरी कंपनी म्हणजे टेलिकॉम कंपनी. जी कंपनी लोकांपर्यंत सेवा पोहोचवते. आता समजा जर सॅटेलाईटमध्ये किंवा देखभाल करणाऱ्या कंपनीतच बिघाड झाला, तर देशभरातले मोबाईल काम करणं बंद करतील. आज घडलेला प्रकार तसाच आहे.
मायक्रोसॉफ्ट अझुर आणि मायक्रोसॉफ्ट 365 या दोन सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला. यापैकी अझूर सॉफ्टवेअर हे मोठमोठ्या कंपन्या वापरतात. विमानतळं, काही देशातले टीव्ही चॅनल्स, बँका, शेअर बाजार, इथल्या कारभारासाठी अझूर सॉफ्टवेअर प्रणालीवर काम होतं. तर मायक्रोसॉफ्ट 365 च्या आधारानं तुमच्या-आमच्या कॉम्प्युटरमध्ये असणारे मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपाँईटचा समावेश होतो. आता या दोन्ही सॉफ्टवेअरच्या देखभालीची जबाबदारी क्राउडस्ट्राइक एक दुसरी कंपनी करते. माहितीनुसार त्याच क्राऊडस्टाईकच्या अपडेशनमध्ये बिघाड झाला. ज्यामुळे मायक्रोसॉफ्टचे अझूर आणि 365 या दोन्ही यंत्रणा बंद पडल्या. आणि परिणामी ही प्रणाली वापरणाऱ्या कंपन्यांचे व्यवहार बंद झाले.
यामागे काही जण सायबर हल्ल्याचा दावा करत आहेत. काहींनी हा दावा नाकारला आहे. मात्र जर सायबर हल्ला असेल तर जगातला हा सर्वात मोठा सायबर हल्ला ठरेल. एका अणुबॉम्बमध्ये सुद्धा संपूर्ण जग बंद पाडण्याची ताकद नाहीय. मात्र एक व्यक्ती घरी बसल्या-बसल्या
सारं जग बंद करु शकतो.