Microsoft Server Down : जगभरात लाखो लोक मायक्रोसॉफ्टचा वापर करतात. पण शुक्रवारी अचानक मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर बंद झाला. मायक्रोसॉफ्टचा वापर करणाऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेक विमानसेवांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तसेच अनेक बँकांचे कामकाज ठप्प झाले आहे. एवढंच नव्हे तर मायक्रोसॉफ्टमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका लंडन शेअर मार्केटला बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार दुपारी साधारण १२.३० दरम्यान मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर ठप्प झाला. अनेक युजर्सला ब्लू स्क्रीनची समस्या आली. त्यानंतर अचानक काही डिव्हाईस बंद झाले. यानंतर आता कंपनीने याबद्दल एक संदेश पाठवला आहे.
“तुमच्या डिव्हाईसमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने तो रिस्टार्ट करण्याची गरज आहे. आम्ही हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. तो दुरुस्त झाल्यानंतर तुमचा डिव्हाईस रिस्टार्ट करता येईल”, असे मायक्रोसॉफ्टने नमूद केले आहे.
How will Microsoft fix this xd when they themselves are using Microsoft for their entire work 😂☠️ pic.twitter.com/bdbMEw42iQ
— Ash (@indanime106) July 19, 2024
मायक्रोसॉफ्टने काही दिवसांपूर्वी क्राऊड स्क्रीम अपडेट केलं होतं. त्यानंतर अनेकांना या समस्येचा सामना करावा लागला. या समस्येमुळे अनेक लोक त्रस्त झाले आहेत. मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन झाल्याचा सर्वाधिक फटका विमानसेवेला बसला आहे. तसेच स्काय न्यूज ऑफ एअरचे प्रक्षेपण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने जगभरातील विमानसेवा ठप्प झाली आहे. मुंबई, दिल्ली यांसारख्या अनेक मोठमोठ्या विमानतळांना याचा फटका बसला आहे. यामुळे काही उड्डाण रद्दही करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यात प्रवाशांनी प्रवासापूर्वी दोन ते तीन तास आधी विमानतळावर येण्याची सूचना केली आहे. विमानसेवेसह बँकांच्या कामकाजांवरही याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. तसेच यामुळे लंडन शेअर मार्केटलाही मोठा फटका बसला आहे.
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया सरकारने तात्काळ आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत नेमकं काय घडलं, हा सर्व्हर सुरु होण्यास किती कालावधी लागेल, याबद्दल चर्चा केली जाणार आहे.