Russia-Ukraine War | युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की अगदी थोडक्यात बचावल्याच वृत्त आहे. सध्या रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. दोन वर्ष होऊनही हे युद्ध थांबलेलं नाहीय. जेलेंस्की यांचा ताफा जात असताना मिसाइल हल्ला झाला. जेलेंस्की यांच्या ताफ्याच्या खूप जवळ हे मिसाइल येऊन पडलं. रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच जेलेंस्की यांच्या ताफ्याजवळ अशा प्रकारचा मिसाइल हल्ला झाला. ओडेसा येथे युक्रेनचे राष्ट्रपती आणि ग्रीसच्या पंतप्रधानांची भेट होणार होती. राष्ट्रपती जेलेंस्की यांचा ताफा ग्रीस दुतावासाजवळ पोहोचला, तेव्हा 100 मीटर अंतरावर हा मिसाइल हल्ला झाला.
रशिया-युक्रेन युद्धाला मागच्या महिन्यात दोन वर्ष पूर्ण झाली. प्रयत्न करुनही दोन्ही देशांमध्ये शांतता संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. सतत ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याच्या बातम्या येत असतात. युरोपियन काऊन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सच्या सर्वेतून एक बाब समोर आलीय. यूरोपियन काउंसिल ऑन फॉरेन रिलेशन्सच्या सर्वेनुसार, युरोपातील बहुतांश लोक रशिया विरुद्ध युद्धात युक्रेनच समर्थन करतात.
किती जणांना वाटत युक्रेन युद्ध जिंकेल?
पण 10 पैकी फक्त एकाच माणसाला वाटतं की, या युद्धात युक्रेन जिंकू शकतो. चर्चा, तडजोडीनेच हे युद्ध संपू शकतं, असं अनेकांच मत आहे. रशियासोबत चर्चेऐवजी थेट युक्रेनच्या प्रत्युत्तराच्या कारवाईचही काहीजण समर्थन करतात.
रणनितीक दृष्टीने महत्त्वपूर्ण भाग रशियाच्या ताब्यात
रशियाने युक्रेनच्या काही शहरांवर ताबा मिळवलाय. युक्रेन अजूनही रशियासमोर टिकून आहे, त्यामागे कारण आहे, अमेरिकेकडून मिळणारी शस्त्रास्त्र आणि नाटो देशांची रसद. या दोघांनी हात खेचून घेतल्यास रशिया आरामात युक्रेनवर विजय मिळवू शकतो. रशियन सैन्याने युक्रेनची काही शहर ताब्यात घेतली आहेत. रणनितीक दृष्टीने महत्त्वपूर्ण भाग रशियाने आपल्या ताब्यात ठेवला आहे.