Israel Iran Conflicts : इराणसोबत संघर्ष सुरु असताना इस्रायलला आणखी एक धक्का बसला आहे. लेबनॉनच्या आकाशातून उड्डाण करणारं एक इस्रायली विमान पाडण्यात आलं. हे मानवरहीत विमान होतं. जमिनीवरुन हवेत मारा करणार क्षेपणास्त्र डागून हे एअरक्राफ्ट पाडण्यात आलं. हल्ल्यानंतर हे विमान लेबनॉनच्या हद्दीत जाऊन कोसळलं. पण प्रश्न हा आहे की, या इस्रायली एअरक्राफ्टला कोणी लक्ष्य केलं?. सध्या इस्रायल आणि इराणचे संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. इस्रायलने सीरियामधील इराणच्या दूतावासावर एअर स्ट्राइक केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर 300 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सनी हल्ला केला. त्यानंतर शुक्रवारी इराणसाठी रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या एका शहरावर हल्ला करण्यात आला. यामागे इस्रायल असल्याच बोलल जातय. दोन्ही देशांमध्ये कुठल्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल अशी स्थिती आहे.
मध्य पूर्वेमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे. इस्रायल आणि इराणमध्ये वार-पलटवारचा खेळ सुरु आहे. कारवाई, बदला यामध्ये मध्य पूर्वेचे अनेक देश होरपळत आहेत. या सगळ्यामध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वाची आहे. अमेरिका नेहमीच भक्कमपणे इस्रायलच्या पाठिशी उभी राहिली आहे.
कोणी डागलं हे क्षेपणास्त्र?
या सगळ्या वादावादीमध्ये इस्रायली एअरक्राफ्टला टार्गेट करण्यात आलय. रविवारी रात्री इस्रायलच एक मानवरहीत एअरक्राफ्ट लेबनॉनच्या आकाशातून उड्डाण करत होतं. त्याचवेळी जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. हे विमान लेबनॉनच्या भागात जाऊन पडलं. हे क्षेपणास्त्र लेबनॉनने डागलं की, इराणने या बद्दल अजून स्पष्टता नाहीय.
एकदिवस आधीच इस्रायलकडून झालेला हल्ला
या हल्ल्याच्या एकदिवस आधीच इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तीन नागरिक जखमी झाले होते. ज्यांचा मृत्यू झाला, ते सर्वच हिजबुल्लाहचे दहशतवादी होते. इस्रायलने दक्षिण लेबनॉनच्या सीमावर्ती गावांमध्ये हा हल्ला केला होता. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये शत्रुत्व खूप जुनं आहे. हमास विरुद्ध युद्ध सुरु झाल्यापासून इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये संघर्ष अधिक तीव्र झालाय.
इस्रायलच एकाचवेळी अनेक आघाड्यांवर युद्ध
इस्रायल-हमास युद्ध सुरु झाल्यापासून हिजबुल्लाहने इस्रायलला धमक्या दिल्या. त्यांच्यावर हल्ले केले. इस्रायलने सुद्धा प्रतिहल्ल्याने प्रत्युत्तर दिलं. हिजबुल्लाह-इस्रायल ताज्या संघर्षात लेबनॉनमध्ये जवळपास 400 पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. यात 270 हिजबुल्लाहचे दहशतवादी आहेत. इस्रायल एकाचवेळी अनेक आघाड्यांवर युद्ध लढतोय.