तुम्हाला मृत्यूची भीती वाटतेय का?; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॉडकास्टमध्ये जे सांगितलं…

| Updated on: Mar 16, 2025 | 7:21 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लेक्स फ्रिडमन यांच्याशी झालेली सव्वा तीन तासांची मुलाखत वैश्विक पातळीवरील अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकते. मृत्यूच्या भीतीबाबतच्या प्रश्नावर मोदींचा विचारोत्तेजक प्रतिसाद आणि भविष्याबाबतचा आशावादी दृष्टिकोन या मुलाखतीतील प्रमुख आकर्षण आहे.

तुम्हाला मृत्यूची भीती वाटतेय का?; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॉडकास्टमध्ये जे सांगितलं...
narendra modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

PM Modi Podcast With Lex Fridman : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैश्विक पातळीवरची प्रदीर्घ मुलाखत रिलीज झाली आहे. प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी मोदींची मुलाखत घेतली आहे. सव्वा तीन तासाचा हा पॉडकास्ट आहे. या पॉडकास्टमध्ये मोदींच्या जीवनातील अनेक गोष्टींचं सार आलं आहे. मोदींचं बालपण, आईवडिलांचा प्रभाव, विवेकानंदांची शिकवण, संघातील दिवस, ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री, शी जिनपिंग आणि पाकिस्तानबाबतची परखड मते, या सर्व गोष्टींवर मोदींनी वैश्विक पातळीवर भाष्य केलं आहे. यावेळी मोदींना लेक्सने एक वेगळाच प्रश्न केला. तुम्हाला मृत्यूची भीती वाटते का? असं लेक्स म्हणाला. त्यावर मोदींना हसू फुटलं आणि म्हणाले…

अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी मोदींना अनेक सवाल विचारले. त्यात एक अत्यंत वेगळा सवाल होता. लेक्स म्हणाला, तुम्ही तुमच्या मृत्यूचा विचार करता? तुम्हाला मृत्यूची भीती वाटते? यावर मोदी जोरात हसले. मोदी म्हणाले, मी या बदल्यात तुम्हाला एक सवाल करू शकतो का? जन्मानंतर जीवन आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण त्यात अधिक निश्चित कोणती बाजू आहे? त्यावर मोदींनी स्वत: उत्तर दिलं मृत्यू. जो जन्माला येतो, त्याची मृत्यू होतेच हे आपल्याला माहीत आहे. आयुष्य तर फुलते, असं मोदी म्हणाले.

मृत्यूला घाबरायचं का?

जी गोष्ट निश्चित आहे, त्याची भीती का वाटावी? संपूर्ण वेळ आयुष्यावर खर्ची घाला. संपूर्ण मेंदू मृत्यूवर कशाला केंद्रीत करता? तरच जीवन विकसित आणि समृद्ध होईल. कारण सर्व काही अनिश्चित आहे. त्यामुळे त्यात मेहनत केली पाहिजे. गोष्टी सुधारल्या पाहिजे. म्हणजे मृत्यूच्या आधी तुम्ही उद्देशाने जगलं पाहिजे. त्यामुळेच तुम्हाला मृत्यूची भीती सोडली पाहिजे. शेवटी मृत्यू येणारच आहे. मृत्यू कधी येणार याची चिंता करण्यात अर्थ नाही. तिला जेव्हा यायचंय तेव्हा ती येणारच आहे. जेव्हा तिला वेळ असेल तेव्हा निश्चित येईल, असंही मोदी यांनी सांगितलं.

भविष्याच्या आशेवर…

त्यानंतर मोदींना भविष्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण मानवी सभ्यतेचं पृथ्वीवरील भविष्य काय आहे? असा सवाल लेक्सने विचारला. त्यावरही मोदींनी आपल्या अमोघ शैलीत उत्तर दिलं. मी स्वभावानेच आशावादी आहे. निराशावाद आणि नकारात्मकता माझ्या आसपासही येत नाही. त्यामुळे हे सर्व माझ्या डोक्यात येत नाही. जर आपण मानव जातीचा इतिहास पाहिला तर असंख्य संकटाना पार करून मानव जात पुढे आली आहे. काळानुसार बदल स्वीकार केला आहे. प्रत्येक युगात मानवाने नव्या गोष्टी स्वीकारण्याचं औदार्य दाखवलं आहे, असं मोदी म्हणाले.