Moscow Attack : ….म्हणून इस्लामिक स्टेटने यावेळी रशियाला टार्गेट केलं का? यामागे राजकारण काय?

| Updated on: Mar 23, 2024 | 11:10 AM

Moscow Attack : रशियामध्ये शुक्रवारी संध्याकाळी भीषण दहशतवादी हल्ला झाला. मॉस्को येथे एका कॉन्सर्ट हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असून 145 जण जखमी झाले आहेत. मागच्या अनेक दशकातील रशियन भूमीवर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

Moscow Attack : ....म्हणून इस्लामिक स्टेटने यावेळी रशियाला टार्गेट केलं का? यामागे राजकारण काय?
ISIS
Follow us on

रशियाची राजधानी असलेलं मॉस्को शहर शुक्रवारी दहशतवादी हल्ल्याने हादरलं. एका कॉन्सर्ट हॉलला दहशतवाद्यांनी टार्गेट केलं. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह घुसलेल्या दहशतवाद्यांनी अत्यंत निर्दयतेने अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असून 145 जण जखमी झाले आहेत. मागच्या अनेक दशकातील रशियन भूमीवर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. इस्लामिक स्टेटच्या ISIS-K म्हणजे अफगाण शाखेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टेलिग्रामवरील अमाक एजन्सीद्वारे त्यांनी ही माहिती दिली. या हल्ल्यामुळे ISIS-K ची क्षमता दिसून आली आहे. सध्या रशिया युक्रेन बरोबरच्या युद्धात व्यस्त आहे. मागच्या दोन वर्षांपासून सुरु असलेल हे युद्ध आता निर्णायक टप्प्यावर आहे. इस्लामिक स्टेट खोरासन ISIS-K ही दहशतवादी संघटना मुख्य इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड इराकशी ISIS संबंधित आहे.

ISIS-K चा जन्म पूर्व अफगाणिस्तानात 2014 मध्ये झाला. इराण, तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तान प्रांतावरुन इस्लामिक स्टेट खोरासन नाव देण्यात आलय. कट्टरपंथीय तत्व आणि अत्यंत क्रूर वर्तन यामुळे ISIS-K ला अल्पावधीत ओळख मिळाली. तालिबान आणि अमेरिकन सैन्याच्या प्रयत्नामुळे 2018 पासून इस्लामिक स्टेट खोरासनची ताकद कमी झाली. ISIS-K पासून अफगाणिस्तान, तालिबानला धोका कायम आहे. 2021 साली अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडलं. त्यामुळे ISIS-K बद्दल मिळणारी गोपनीय माहिती सुद्धा कमी झाली. ISIS-K ने अफगाणिस्तानात अनेक भीषण दहशतवादी हल्ले केले आहेत. यात मशिदींवर हल्ले, काबूलमध्ये रशियन दूतावासावर हल्ला, 2021 मध्ये काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला, यात अनेक निष्पाप नागरिक आणि सैनिक मारले गेले.

म्हणून रशियावर हल्ला झाला का?

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मध्य पूर्वेत खासकरुन सीरियामध्ये हस्तक्षेप केला. सीरियन अध्यक्ष बाशर असाद यांच्या मदतीसाठी पुतिन यांनी रशियन सैन्य पाठवलं. याच रागापोटी ISIS-K ने रशियाच्या कॉन्सर्ट हॉलवर हल्ला केल्याची दाट शक्यता आहे. पुतिन यांनी हस्तक्षेप करुन ISIS ची सीरियासाठी जी धोरण, उद्दिष्ट होती, त्याला थेट विरोध केला. त्यामुळेच ISIS-K ने रशियाला टार्गेट केल्याची शक्यता आहे.