रशियाची राजधानी मॉस्को शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे… चार ते पाच अज्ञात बंदूकधरकांनी शहरातील वर्दळीचं ठिकाण असलेल्या क्राकस सिटी कॉन्सर्ट हॉलमध्ये घुसून गोळीबार केला आहे. या गोळीबारात 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 145 लोक या गोळीबारात गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर या कॉन्सर्ट हॉलमध्ये आणखी काही लोक अडकल्याची माहिती मिळत आहे. कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (IS) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. रशियामध्ये यापूर्वीही अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. तर आज जाणून घेऊ रशियावर यापूर्वी झालेले दहशतवादी हल्ले…
1999 अपार्टमेंट स्फोट : दक्षिणपूव्री मॉस्कोमध्ये 13 सप्टेंबर 1999 मध्ये एका आठ मजली अपार्टमेंटमध्ये स्फोट झाला होता. ज्यामध्ये 118 लोकांचा मृत्यू झाला. हा हल्ला पाच अपार्टमेंट हल्ल्यांपैकी एक होता ज्यात दोन आठवड्यांच्या कालावधीत मॉस्को आणि दक्षिण रशियामध्ये एकूण 293 लोक मारले गेले आणि 1,000 हून अधिक जखमी झाले. त्याचवेळी रशियाने या हल्ल्यासाठी चेचन्यातील फुटीरतावादी दहशतवाद्यांना जबाबदार धरले. मात्र, चेचन्याच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी सर्व आरोप फेटाळले होते.
डबरोव्का थिएटर हल्ला : 23 ऑक्टूबर 2002 रोजी चेचन्या बंडखोरांच्या एका गटाने मॉस्कोच्या थिएटरमध्ये हल्ला केला. बंडखोरांनी तब्बल 800 पेक्षा अधिक लोकांना बंदी केलं. चेचन्याचे बंडखोर आणि सुरक्षा दल यांच्यातील संघर्ष दोन दिवस आणि तीन रात्री चालला. यावेळी सुरक्षा दलांनी हल्लेखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चित्रपटगृहात गॅस सोडला आणि हल्लेखोरांवर हल्ला केला. सुरक्षा दलांच्या या कारवाईत तब्बव 130 लोकांचा मृत्यू झाला. तर काहींचा मात्र गुदमरल्यामुळे मृत्यू झाला.
रॉक कॉन्सर्टवर हल्ला : 5 जुलै 2003 रोजी मॉस्कोजवळील तुशिनो एअरफील्डवर एका रॉक कॉन्सर्टदरम्यान दोन महिला आत्मघाती हल्लेखोरांनी स्वत:ला संपवलं. या आत्मघाती हल्ल्यात तब्बल 15 लोकांचा मृत्यू झाला. तर 50 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले. हा हल्ला झाला तेव्हा सुमारे 20,000 नागरिक वार्षिक क्रिल्या (विंग्स) महोत्सवात रशियाचे काही प्रमुख बँड ऐकण्यासाठी आले होते.
मेट्रो बॉम्बस्फोट : 6 फेब्रुवारी 2004 रोजी, चेचन्यातील एका गटाने सकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांनी भरलेल्या मॉस्को मेट्रोमध्ये बॉम्बस्फोट केला, ज्यात 41 लोक ठार झाले.
मेट्रो आत्मघाती हल्ला : 29 मार्च 2010 मध्ये दोन महिला आत्मघाती हल्लेखोरांनी मॉस्को मेट्रोमध्ये स्वतःला संपवलं. या आत्मघाती हल्ल्यात 40 लोकांचा मृत्यू झाला. रशियाने दोन्ही हल्लेखोर दागेस्तानच्या अस्थिर उत्तर काकेशस प्रदेशातील असल्याचं समोर आलं….
विमानतळावर हल्ला : 24 जानेवारी 2011 रोजी मॉस्को डोमोडेडोवो अंतरराष्ट्रीय विमानतळावर आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला होता. ज्यामध्ये 37 जणांचा मृत्यू झाला होता. काकेशस एमिरेट ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.