गुन्हेगारी विश्वात अनेक गुन्ह्यांचा शोध लागत नाही. काहीच पुरावा नसल्याने अनेकदा फाईल बंद करावी लागते. त्यामुळे ज्यांच्यावर अत्याचार झाला, त्यांच्या कुटुंबीयांच्या पदरी निराशा येते. पण शेवटी गुन्हा हा कधी ना कधी उजागर होतोच. अत्यंत किचकट समजल्या जाणाऱ्या गुन्ह्यात एक पुरावाही महत्त्वाचा ठरतो आणि आरोपी गजाआड होतो. अमेरिकेतही अशाच एका गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे 44 वर्षानंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे 44 वर्षानंतर का होईना पीडितेच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अमेरिकेत 44 वर्षापूर्वी एका कॉलेजमधील तरुणीचा बलात्कार झाला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. ही मर्डर मिस्ट्री अखेर सोडवण्यात आली आहे. 1980मध्ये ही सनसनीखेज घटना घडली होती. या बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण शहरात एकच दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणी अखेर पोलिसांनी एका 60 वर्षाच्या व्यक्तीला अटक केली आहे. विशेष म्हणजे एका च्युइंगममुळे हा आरोपी पकडला गेला आहे.
एका च्युइंगममुळे आरोपी पकडला जाऊ शकतो आणि तोही 44 वर्षानंतर हे तुम्ही कधी ऐकलंय का? अमेरिकेच्या स्टेट ओरेगॉनमधील एका व्यक्तीला 1980मध्ये एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात हा आरोपी दोषी आढळला. त्याने खाललेल्या च्युइंगममध्ये सापडलेल्या डीएनएवरून त्याची पोलखोल झाली आहे. आरोपीचं नाव रॉबर्ट असं आहे. तो 60 वर्षाचा आहे. त्याला गेल्या आठवड्यात फर्स्ट डिग्री हत्येच्या प्रकरणात आणि सेकंड डिग्री चार हत्यांच्या प्रकरणात तो दोषी आढळला.
मल्टनोमाह काऊंटी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 15 जानेवारी 1980मध्ये घडली होती. बारबरा टकर या 19 वर्षीय कॉलेज विद्यार्थीनीचं कथित अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर रॉबर्टने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कम्पस पार्किंगमध्ये तिला बेदम मारहाण करत तिची हत्या केली. बारबरा माउंट हूड कम्युनिटी कॉलेजची विद्यार्थीनी होती. सकाळी जेव्हा विद्यार्थी कॉलेजात आले तेव्हा त्यांना बारबराचा मृतदेह दिसला. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती दिली गेली.
दरम्यान, रॉबर्टने आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. रॉबर्टला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आम्ही कोर्टात अपील करणार आहोत, असं रॉबर्टच्या वकिलांनी सांगितलं. आम्ही अपील करू, रॉबर्टची शिक्षा रद्द होईल याची आम्हाला खात्री आहे, असं वकील स्टिफन हाऊज आणइ जॅकब हाऊज यांनी सांगितलं.
2000मध्ये बारबराचा मृतदेह विश्लेषण करण्यासाठी ओरेगन स्टेट पोलीस क्राईम लॅबकडे पाठवण्यात आला. तिच्या व्हजायना स्लॅबचंही परीक्षण करण्यात येणार होतं. क्राईम लॅबमध्ये व्हजायना स्लॅबमधून एका अतिरिक्त डीएनए प्रोफाईलची माहिती मिळाली. चौकशी पथकाला या प्रकरणात रॉबर्टवर संशय होता. पण कोणताच पुरावाजवळ नव्हता.
या तरुणीच्या मृतदेहातून मिळालेला अतिरिक्त डीएनए तब्बल 21 वर्ष जतन करून ठेवण्यात आला. या दरम्यान रॉबर्टवर पाळतही होती. त्याचा डीएनए हवा होता. एकदा रॉबर्ट च्युइंगम खाऊन थुंकला. पोलिसांनी हे च्युइंगम सँपल म्हणून घेतलं आणि क्राईम लॅबला पाठवलं. त्याचं परीक्षण केलं असता तरुणीच्या मृतदेहात मिळालेल्या डीएनएशी रॉबर्टचं डीएनए जुळलं आणि अशा पद्धतीने त्याचा पर्दाफाश झाला.
त्यानंतर 8 जून 2021मध्ये रॉबर्टला अटक करण्यात आली. त्याला मल्टनोमाह काऊंटी डिटेंशन सेंटरमध्ये ठेवलं गेलं. सध्या रॉबर्ट पोलिसांच्या अटकेत आहे. गुन्ह्यात तो दोषी आढळला असून त्याला शिक्षा व्हायची आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता जूनमध्ये होणार आहे.