काबूल : अफगाणिस्तानमध्ये एका प्रसिद्ध हास्य कलाकाराची (कॉमेडियन) हत्या करण्यात आली. तालिबानशी संबंधित दहशतवाद्यांनी ही हत्या केल्याचा आरोप आहे. नजर मोहम्मद म्हणजेच खाश ज्वान असं मृत कलाकाराचे नाव आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये काही कथित तालिबानी दहशतवादी पीडित खाश जान यांना मारहाण करताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. तालिबानचा प्रवक्ता जबिउल्ला मुजाहिद यानेही या घटनोला दुजोरा दिलाय.
तालिबानचे प्रवक्ते मुजाहिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉमेडियन खाश यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आलीय. त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवण्यात येईल, असंही मुजाहीद यांनी म्हटलं. खाश यांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करायला हवं होतं. आलं. मात्र, तसं न करता त्यांची हत्या करण्यात आली. म्हणून हत्या करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली.
दरम्यान खाश हे अफगाण पोलीस दलाचे सदस्य होते. अमेरिकेच्या सैन्यासोबत काम केलेल्यांना सध्या तालिबानी निशाणा (लक्ष्य) करत आहेत. तालिबानचं नियंत्रण असलेल्या भागात अशा अनेकांना कैद करण्यात आलंय. त्यामुळेच तालिबानने खाश यांच्या हत्येवर दिलेल्या स्पष्टीकरणाकडे संशयाने पाहिलं जातंय. अफगाणिस्तानात स्थानिकांनी अमेरिका आणि नाटो देशांच्या सैनाला यापूर्वी मदत केली होती. आता या नागरिकांना तालिबान त्रास देत आहे. यामुळे देशातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे नागरिक मदतीची याचना करत आहेत.