Airstrike : भारताच्या शेजारी देशाने आपल्याच माणसांवर केला एअर स्ट्राइक, 100 जण ठार

| Updated on: Apr 12, 2023 | 11:48 AM

Airstrike : दहशतवांद्यांना सोडून आपल्याच माणसांवर एअर स्ट्राइक करण्याच कारण काय? या हवाई हल्ल्यात निरपराध लहान मुल, महिलांचा मृत्यू झाला. आधी एअर स्ट्राइक नंतर हेलिकॉप्टरमधून अंदा-धुंद गोळीबार.

Airstrike : भारताच्या शेजारी देशाने आपल्याच माणसांवर केला एअर स्ट्राइक, 100 जण ठार
Air strike
Image Credit source: Representative image
Follow us on

Myanmar Airstrike : भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये सध्या अशांतता आहे. तिथे सैन्याने सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. या विरोधात तिथली जनता उठाव करत असते. मंगळवारी म्यानमारमधील शासनकर्त्यांनी आपल्याच एका गावावर एअर स्ट्राइक केला. यात 100 जणांना आपला प्राण गमवावा लागला. यात अनेक बालकं आहेत. सध्याच्या शासनकर्त्यांविरोधात एक चळवळ उभी राहिली आहे. या आंदोलकांच्या कार्यालयाच उद्घाटनासाठी सागाइग प्रांतातील पाझीगी गावात हे लोक जमले होते.

मंगळवारी लोक एकत्र जमलेले असताना सकाळी 8 च्या सुमारास फायटर जेटमधून बॉम्बफेक करण्यात आली. जवळपास 150 लोक त्या ठिकाणी होते, असं प्रत्यक्षदर्शीने असोसिएटेड प्रेसला सांगितलं. मृतांमध्ये महिला आणि 20-30 बालकांचा समावेश आहे. सरकार विरोधात उभ्या राहिलेल्या सशस्त्र गटाच्या नेत्याचा सुद्धा या एअर स्ट्राइकमध्ये मृत्यू झाला.

हेलिकॉप्टरमधून अंदाधुंद गोळीबार

सुरुवातीला हवाई हल्ला झाला. त्यानंतर अर्ध्यातासाने हेलिकॉप्टर तिथे आलं. त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हवाई हल्ल्यात नेमका किती जणांचा मृत्यू झालाय, ते अजून स्पष्ट नाहीय. पण लष्करी सरकारने रिपोर्टिगवर निर्बंध घातले आहेत. मंगळवारी रात्री म्यानमारमधील शासकांनी हल्ला केल्याचा कबूल केलं.

सुरुंग पेरल्याचा आरोप

“पीपल्स डिफेन्स फोर्स कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास पाझीगी गावात लोक एकत्र जमले होते. पीपल्स डिफेन्स फोर्स ही नॅशनल युनिटी गर्व्हमेन्टची सशस्त्र शाखा आहे. आपण अधिकृत सरकार आहोत, असं त्यांच म्हणण आहे” असं म्यानमार लष्कराने प्रवक्त्याने म्हटलं. पीपल्स डिफेन्स फोर्सने सुरुंग पेरल्याचा आरोप लष्कराने केला.

संयुक्त राष्ट्राच म्हणणं काय?

म्यानमारच्या लष्कराने केलेल्या या एअर स्ट्राइकचा संयुक्त राष्ट्राने निषेध केलाय. संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी, म्यानमारच्या लष्कराने जनतेविरोधात चालवलेला हिंसाचार बंद करण्याच आवाहन केलय. दहशतवाद्यांच्या लष्कराने केलेलं हे क्रूर कृत्य आहे असं म्यानमारमधील विरोधी पक्षात असलेल्या नॅशनल युनिटी गर्व्हमेन्टने म्हटलय.