तेल अवीव | 11 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) दरम्यान सुरू झालेलं युद्ध अजूनही थांबलेलं नाही. या युद्धात पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन्ही देशाचं अतोनात नुकसान झालं आहे. दोन्ही देशांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात दोन्ही देशातील शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. अनेक इमारती उद्ध्वस्त झाले आहेत. मृतांमध्ये अनेक परदेशी नागरिकही आहेत. भारतातील छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ आणि ‘उतरन’ फेम अभिनेत्री मधुरा नायक (Naagin Actress Madhura Naik) हिच्यावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या युद्धात तिच्या घरातील माणसं मारले गेले आहेत. त्यामुळे मधुरा आणि तिचे कुटुंबीय प्रचंड हादरून गेले आहेत.
नागिन फेम अभिनेत्री मधुरा नायक हिने इन्स्टाग्रामवर हे व्हिडीओ शेअर करून अत्यंत दु:खी होत ही धक्कादायक माहिती दिली आहे. या व्हिडीओत मधुराला दु:खावेग झालेला दिसून येतोय. तिला बोलतानाही त्रास होताना दिसतोय. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मी मधुरा नायक. भारतात जन्मलेली यहुदी आहे. भारतात फक्त 3 हजार यहुदी आहेत. 7 ऑक्टोबरच्या आधी आमच्या कुटुंबातील एक मुलगी आणि एका मुलाला आम्ही गमावलं आहे, अशी माहिती मधुराने दिली आहे.
माझी बहीण ओडाया आणि तिच्या नवऱ्याला हमासच्या दहशतवाद्यांनी ठार मारलं आहे. तेही त्यांच्या दोन मुलांसमोरच. आज माझं कुटुंब ज्या वेदना आणि त्रासाला सामोरे जातंय ते शब्दात सांगता येणं कठिण आहे. आज इस्रायल संकटात आहे. हमासच्या आगडोंबात लहान मुलं, स्त्रिया आणि म्हातारी माणसं होरपळून निघत आहेत, असं तिने म्हटलं आहे.
स्त्रिया, मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केलं जात आहे. काल मी माझी बहीण, तिचा नवरा आणि त्यांच्या मुलांचा फोटो शेअर केला होता. जगाने आमचं दु:ख पाहावं म्हणून मी हे केलं. पण पॅलेस्टाईनचा प्रपोगंडा कसा चाललाय हे पाहून मला आश्चर्य वाटतंय. हा प्रो पॅलेस्टाईन प्रपोगंडा इस्रायलच्या नागरिकांना खलनायक दाखवत आहे. हे योग्य नाही. स्वत:चा बचाव करणं म्हणजे दहशतवाद नाहीये, असंही तिने म्हटलंय.