अबूजा : नायजेरियाच्या उत्तर पश्मिमेकडील बेन्यूमध्ये रक्तरंजित घटना उघडकीस आली आहे. काही बंदूकधाऱ्यांनी येथील बाजारात येऊन अंधाधूंद गोळीबार केला. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जो तो जिवाच्या आकांताने पळत होता. या गोळीबारात एक दोन नव्हे तर 47 लोक ठार झाले. आदल्या दिवशी याच बंदूकधाऱ्यांनी तीन जणांची हत्या केली होती. त्यामुळे मृतांची संख्या 50 झाली आहे. या घटनेची कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, या घटनेनंतर परिसरात प्रचंड भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही स्थानिक मेंढपाळांनी हा हल्ला केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
उत्तर मध्य नायजेरियामध्ये जमिनीचे वाद सुरू आहेत. या वादातून मेंढपाळ आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा हाणामाऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे हा हल्ला या मेंढपाळांनी घडवून आणला असावा असा पोलिसांचा कयास आहे. ओटुक्पो अध्यक्ष रुबेन बाको यांनी या हत्येची पुष्टी केली आहे. बेन्यूच्या उमोगिदी गावात बंदूकधाऱ्यांनी 47 लोकांना ठार मारलं. त्याआधी याच ठिकाणी तीन लोकांची हत्या करण्यात आली होती, असं ओटुक्पो यांनी सांगितलं. बंदूकधारी तोंडाला मास्क लावून आले होते. त्यांनी बाजारात आल्या आल्या काहीही न बोलता थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रत्येकजण जीवाच्या आकांताने पळत होता. पळत असताना चेंगराचेंगरीचीही घटना घडल्या. अनेकांना धावपळीत किरकोळ मारही लागला, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
दरम्यान, या हल्ल्याची कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. त्यामुळे या हल्ल्याचा संशय स्थानिक मेंढपाळांवर व्यक्त केला जात आहे. नायजेरियाच्या उत्तर पश्चिम आणि मध्य क्षेत्रात शेतकरी आणि मेंढपाळांमध्ये काही दशकांपासून संघर्ष सुरू आहे. जमिनीचा हा वाद आहे. त्यामुळे यंदा शेतीतून उत्पन्नही कमी आलं आहे. या क्षेत्रात गरीबी प्रचंड आहे. भूकबळीही जात आहेत. या जमिनीवरील पिकं जनावरांसाठी आहे. हा चारा जनावरांना मिळाला पाहिजे, असं मेंढपाळांचं म्हणणं आहे. तर आमच्या शेतीत तुमचं काम काय? असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
दरम्यान, रशियाच्या इंगुशेतिया येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यात तीन पोलिसांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात सात लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. ग्रामीण भागात सशस्त्र टोळी लपल्याची पोलिसांना खबर मिळाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.