जेरुसलेम : सायरन वाजू लागताच लगेच सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी पळापळ सुरु होते. रे़डिओ आणि टीव्ही समोरच लोक दिवसभर बसलेले असतात. जेरुसलेममध्ये राहणाऱ्या अनेकांनी मागच्या पाच दिवसात खूप वेगळा विचित्र अनुभव घेतलाय. दक्षिण इस्रायलमधील अश्कलॉनपासून जेरुसलेम 70 किमी अंतरावर आहे. गाझा पट्टीतून अश्कलॉन शहरावर थेट रॉकेट हल्ला सुरु असतो. इस्रायलमधील सध्याचे दिवस अनिश्चिततेने भरलेले आहेत. जेरुसलेममधून नोहा मस्सील यांनी सध्या तिथे काय परिस्थिती आहे? त्या बद्दल माहिती दिलीय. ते भारतातून इस्रायलमध्ये स्थायिक झालेले ज्यू आहेत. विशेष म्हणजे त्यांचं महाराष्ट्र आणि मुंबईशी खास कनेक्शन आहे. हमासन केलेल्या हल्ल्यामुळे सध्या इस्रायलमध्ये खूपच तणावपूर्ण परिस्थिती आहे. इस्रायलने हमास विरोधात युद्धाची घोषणा केली आहे. पुढचे काही दिवस इस्रायलमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी खूपच कठीण असणार आहेत.
“मागच्या चार दिवसात असे अनेक प्रसंग आले, जेव्हा असुरक्षित वाटलं. शनिवारी सकाळी हमासने केलेल्या हल्ल्यामुळे धक्का बसला. जे घडलय ते खूप भयानक आहे, हे समजायला थोडावेळ लागला” असं नोहा मस्सील म्हणाले. नोहा मस्सील यांचं इस्रायलमध्ये ‘मायबोली’ नावाच त्रैमासिक प्रसिद्ध होतं. विशेष म्हणजे इस्रायलमध्ये प्रसिद्ध होणार हे मराठी त्रैमासिक आहे. तीन महिन्य़ातून एकदा हे त्रैमासिक प्रकाशित होतं. नोहा मस्सील हे इस्रायलमधील भारतीय ज्यू संघटनेने अध्यक्ष आहेत. पाच दशकापूर्वी वयाच्या 21 व्या वर्षी ते मुंबई सोडून जेरुसलेमला स्थायिक झाले.
इस्रायलमध्ये शेल्टर रुम किती?
“हल्ल्यानंतर रविवारी दुसऱ्यादिवशी जेरुसलेममध्ये सायरन वाजला. त्यानंतर आम्ही लगेच बिल्डिंगमधील शेल्टर रुमकडे धाव घेतली” असं नोहा मस्सील म्हणाले. “मागच्या चार दशकात इस्रायलमध्ये बांधण्यात आलेल्या रहिवाशी आणि व्य़ावसायिक इमारतींमध्ये प्रत्येक मजल्यावर शेल्टर रुम आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये 90 टक्के इमारतींमध्ये शेल्टर रुम असतो. अशा हल्ल्याच्यावेळी तुम्ही तिथे आश्रय घेऊ शकता” असं नोहा मस्सील म्हणाले.
इस्रायलमध्ये भारतीय वंशाच्या ज्यूंची संख्या किती?
इस्रायलमध्ये भारतीय वंशाचे 85 हजार ज्यू राहतात. त्यांच्याकडे इस्रायली पासपोर्ट आहे. 1950 ते 1960 दरम्यान भारतातून मोठ्या प्रमाणात ज्यू इस्रायलमध्ये स्थायिक झाले. महाराष्ट्रातून इस्रायलमध्ये जाणाऱ्या ज्यूंची संख्या सर्वात जास्त होती. त्यांना बेने इस्रायली म्हटल जातं. केरळ (कोचीन ज्यू) आणि कोलकाता (बगदादी ज्यू) यांची संख्या तुलनेने कमी आहे.