मेक्सिको सिटी | 13 सप्टेंबर 2023 : आपण अभिनेता ऋतिक रोशनचा ‘कोई मिल गया’ हा चित्रपट पाहिलाय. या चित्रपटात एलियन्सचं विमान पृथ्वीवर उतरतं. काही काळाने हे विमान आपल्या जगात पुन्हा परततं. पण एक एलियन पृथ्वीवर राहून जातं. हा एलियन त्याची सर्व शक्ती अभिनेत्याला देतो. नंतर या एलियनला चित्रपटातील अभिनेता परत त्याच्या जगात पाठवतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या एलियन्सबद्दल वारंवार चर्चा होते. एलियन्स खरंच आहेत का किंवा नाहीत, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातात. या दरम्यान मॅक्सिको देशातून एक खूप महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. या देशाच्या संसदेत एलियन्सचे दोन मृतदेह दाखल करण्यात आले आहेत.
मेक्सिकोच्या संसदेत एलियन्सचे 2 मृतदेह दाखवण्यात आले आहेत. एलियन्सच्या हाताला आणि पायाला 3 बोटं होती. पेरु देशातील खदानीत हे एलियन्सचे मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह एक हजार वर्ष जुने असल्याची माहिती आहे. संबंधित मृतदेह मानवी नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. या घटनेवर खगोल अभ्यासक अरविंद परांजपे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.
“एलियन्सचे मृतदेह दाखवले आहेत. त्यांनी हे मृतदेह हजार वर्षांपूर्वीचे आहेत, असा दावा केलाय. हजार वर्ष म्हणजे फार जुने नाहीत. मुख्य मुद्दा असा आहे की, त्यांनी कुठल्याही शास्त्रीय नियतकालीकेत या मृतदेहाच्या डीएनएबद्दल याबद्दल कुठेच प्रसिद्ध केलेले नाही. त्यामुळे शंकेला खूप जागा आहे”, अशी प्रतिक्रिया खगोल अभ्यासक अरविंद परांजपे यांनी दिली.
“आपण एलियन्स म्हणतो तेव्हा ते कदाचित जुन्या काळात आले असतील का, असं म्हणतो. पण त्याला कदाचित पाच-सहा हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. पण आता या घटकेला निश्चितपणे सांगणं बरोबर होणार नाही. याचा शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. डीएनए टेस्ट झाली पाहिजे. कार्बन डेटिंग व्हायला हवी. त्यातून त्याचे वय समजेल”, असं अरविंद परांजपे यांनी सांगितलं.
“ते नेमके कुठल्या विमानातून आले होते, का आले होते, याबाबत काहीच माहिती नाही. हजार वर्षे फार जुनी गोष्ट नाही. हे खरंच आले होते का? याबाबत इतक्याच काही सांगता येणार नाही. शास्त्रीय प्रयोग शाळेत संशोधन करुनच काहीतरी सांगता येईल”, अशी भूमिका खगोल अभ्यासक अरविंद परांजपे यांनी मांडली.