लाहोर: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांच्या सरकारचा निर्णय आज रात्री लागणार आहे. आज रात्री 8 वाजता पाकिस्तानच्या (pakistan) नॅशनल असेंबलीत अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. त्यानंतर इम्रान खान यांचं सरकार राहणार की जाणार याचं चित्रं स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शाह महमूद कुरैशी (shah mehmood qureshi) यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही आज आहोत, उद्या नसू. लोकांनी निवडून आलेल्या सरकारविरोधात असं होतं असा कोणता देश आहे, असं कुरैशी म्हणाले. कुरैशी यांच्या या विधानाने इम्रान खान यांच्या सरकारचा सत्तेवरून पाय उतार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, आज सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असूनही इम्रान खान हे असेंबलीत उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
आज रात्री 8 वाजता अविश्वास ठरावावर मतदान घेण्याबाबत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सहमती झाली आहे. त्यामुळे रात्री 8 वाजता अविश्वास ठरावावर मतदान होणार असून त्यानंतर पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचं सरकार राहणार की विरोधकांचं सरकार येणार याचं चित्रं स्पष्ट होणार आहे.
इम्रान खान यांनी काल देशाला संबोधित करताना भारताची स्तुती केली होती. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्या मरियम नवाज या भडकल्या आहेत. शेजारील देश जर इम्रान खान यांना एवढाच आवडत असेल तर त्यांनी सरळ त्या देशात जावं, असं मरियम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, संसद सत्रामध्ये व्होटिंग घेण्यास जाणूनबुजून उशिर केला जात आहे. पीटीआयचे मंत्री आपले भाषण लांबवतील, असा दावाही केला जात आहे. हामिद मीर म्हणाले की, परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी ब्रेक नंतर त्यांचं भाषण सुरू ठेवतील. कमीत कमी तीन तास भाषण करावं, असा आदेश पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना दिल्याचा दावा, मीर यांनी केला आहे.
मीर यांनी पीटीआयच्या संभाव्य योजनेबाबतही भाष्य केलं. पीटीआय अराजकता निर्माण करू शकते. विरोधकांना भडकवू शकते. जर असं काही झालं तर स्पीकर काही विरोधी सदस्यांना निलंबित करू शकतात. त्यामुळे पीटीआयला आपलं बहुमत सिद्ध करता येणार आहे, असा दावा मीर यांनी केला. दरम्यान, स्पीकर असद कैसर यांना आज कोणत्याही परिस्थितीत अविश्वास प्रस्तावावर मतदान घ्यावं लागणार आहे. नाही तर तो कोर्टाचा अवमान ठरेल, असंही सूत्रांनी सांगितलं.
संबंधित बातम्या: