लीबिया | 16 सप्टेंबर 2023 : जगाने पाहिली नाही अशी दुर्देवी घटना घडली आहे. अणूबॉम्ब फुटावा तसं अख्ख धरणच फुटलं. या धरणाच्या पाण्यात घरेदारे, गुरे ढोरे, माणसं सर्वच वाहून गेली. होत्याचं नव्हतं झालं. जिथे गावं होती तिथे नदीचं स्वरुप आलं. संपूर्ण शहरात पुराचं पाणी एवढं घुसलं की अर्ध शहरच उद्ध्वस्त झालं. धरण फुटल्याने आतापर्यंत 40 हजार लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जे लोक मेलेत त्यांचे मृतदेहही सापडत नाहीये. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. जे जगले त्यांच्या मनावर प्रचंड परिणाम झाला असून लीबियात प्रचंड हाहा:कार माजला आहे.
लीबियात धरण फुटून आलेला महापूर ही लीबियाच्या आधुनिक इतिहासातील सर्वात मोठी दुर्देवी घटना आहे. लीबियातील डर्ना शहरात धरण फुटल्याने महापूर आला. महापुराचं पाणी संपूरअण शहरात घुसलं. त्यामुळे घरेदारे जमीनदोस्त झाली. वाहने वाहून गेली. माणसं वाहून गेली. गुरेढोरे वाहून गेली. संसार संपूर्ण वाहून गेला. काहीच शिल्लक राहिले नाही. शिल्लक राहिला तो फक्त चिखल, गाळ आणि चिखल. त्याशिवाय काहीच राहिलं नाही. आतापर्यंत 40 हजार लोक दगावले. 10 हजार लोक बेपत्ता झाले. तर 30 हजार लोकांचं पुनर्वसन केलं जात आहे.
हा महापूर एवढा मोठा होता की मृतदेह सापडत नव्हते. संपूर्ण शहरात पाणीच पाणी झाल्याने डोंगराळ भागात खोदून मृतदेह पुरले जात आहेत. मृतदेह सडत असल्याने तात्काळ त्यांचे दफन केले जात आहे. डर्ना शहर संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. सर्वत्र तुटलेल्या इमारती. नेस्तनाबूत झालेली घरे. गाळ, कचरा, एकमेकांवर जाऊन आदळलेल्या कार… असं चित्र सर्वत्र दिसत आहे. चिखलात पाय ठेवणंही मुश्किल झालं आहे. कारण चिखलात पाय ठेवला तर कुणाचा तरी मृतदेह पायाला लागत आहे. त्यामुळे लोक भयभीत झाले आहेत.
डर्नात युगोस्लाव्हियाच्या कंपनीने 1970मध्ये दोन धरण बांधली होती. पहिलं धरण 75 मीटर उंच होतं. त्यात 1.80 कोटी क्यूबिक मीटर पाणी साठवलं जात होतं. तर दुसरं धरण 45 मीटर उंच होतं. त्यात 15 लाख क्यूबिक मीटर पाणी ठेवलं जात होतं. प्रत्येक क्यूबिक मीटर पाण्यात एक टन वजन असतं. दोन्ही धरणात सुमारे 2 कोटी टन पाणी होते. त्याखाली डर्ना शहर वसवलेलं होतं.
ही धरणं रिकामी होती. या धरणांची गेल्या 20 वर्षांपासून देखभाल केली जात नव्हती. या धरणांची डागडुजीही केलेली नव्हती. दोन्ही धरणे सिमेंटने बांधलेली होती. मात्र, शहरात डॅनियल वादळ आलं. त्यामुळे या धरणामध्ये प्रचंड पाणी जमा झालं. डॅनियल वादळामुळे एक आठवडा या भागात अतिवृष्टी झाली. प्रचंड प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे एवढं पाणी जमा झालं की धरणाची पाणी साठवण क्षमताही संपून गेली. त्यामुळे पाणी प्रचंड झाल्याने धरण फुटलं आणि खाली वसलेलं डर्ना शहर जलमय झालं.