Pakistan election result : पाकिस्तानात गुरुवारी मतदान झाल्यानंतर शुक्रवारी मतमोजणी पार पडली. ज्यामध्ये कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळताना दिसत नाहीये. त्यातच आता माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते गौहर अली खान यांनी त्यांचा पक्ष सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. कारण सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्याकडे सर्वाधिक जागा असल्याचं समोर आलं आहे. इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ल्यांशी संबंधित 12 प्रकरणांमध्ये जामीन मिळाला आहे.
पाकिस्तानमध्ये गुरुवारी एकूण 265 जागांसाठी निवडणूक झाली. अहवालानुसार, आतापर्यंत 250 हून अधिक जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. जाहीर झालेल्या निकालामध्ये अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक ९९ जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी 91 उमेदवार इम्रान यांना पाठिंबा देणारे मानले जात आहेत. त्याचवेळी नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एनने 69 जागा जिंकल्या आहेत आणि पीपीपीने 52 जागा जिंकल्या आहेत.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते गौहर अली खान यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी या जनादेशाचा आदर करण्याचे आवाहन केले. उर्वरित जागांचे निकाल शनिवारी रात्रीपर्यंत जाहीर न झाल्यास त्यांचा पक्ष रविवारी शांततेत आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या 336 जागा आहेत, त्यापैकी 266 जागांवर निवडणूक होते. उर्वरित 70 जागा राखीव आहेत. त्यापैकी 60 जागा महिलांसाठी आणि 10 जागा मुस्लिमेतर उमेदवारांसाठी आहेत. राष्ट्रीय विधानसभेत बहुमतासाठी 133 जागांची आवश्यकता आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि इम्रान खान या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. नवाझ शरीफ यांच्या पक्षाने निवडणुकीत इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. परंतु इम्रान खान यांना तुरुंगात टाकल्यानंतर त्यांच्या पक्षावर देखील बंदी घालण्यात आली होती. पण त्यांच्या समर्थक उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली. ज्यापैकी ९२ उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानाता सस्पेंस कायम आहे की आता कोणाचे सरकार स्थापन होऊ शकते.