इस्लामाबाद: आधीच अटकेची टांगती तलवार असताना पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आता आणखी एका प्रकरणात अडकले आहेत. अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई झाली आहे. इम्रान खान यांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणावर पाकिस्तानात (pakistan) बंदी घालण्यात आली आहे. पोलीस अधिकारी (police) आणि एका महिला मॅजिस्ट्रेटला धमकावल्या प्रकरणी मीडिया नियामक प्राधिकरणाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे इम्रान खान यांना मोठा दणका बसला आहे. विशेष म्हणजे तात्काळ प्रभावाने हा निर्णय लागू करण्यात आला आहे. मात्र, त्यांचे रेकॉर्ड केलेले भाषण तपासूनच प्रसारित केलं जाण्यास परवानगी देण्यता आली आहे. दरम्यान, अवैध फंडिंग प्रकरणात इम्रान खान यांच्या विरोधात यंत्रणांना पुरावे सापडले आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाकिस्तानची इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरीटी (पीईएमआरए)ने याबाबतची माहिती दिली आहे. इम्रान खान यांचे रेकॉर्ड केलेल्या भाषणाची तपासणी करूनच ते प्रसारित करण्याची परवानगी दिली जाईल. त्यामुळे सर्व सॅटेलाईट टीव्ही चॅनेलवर इम्रान खान यांचे लाईव्ह भाषण दाखवण्यास तात्काळ प्रभावाने बंदी घालण्यात आली आहे, असं पीईएमआरएने म्हटलं आहे. इस्लामाबादचे पोलीस महानिरीक्षक, उप महानिरीक्षक आणि महिला मॅजिस्ट्रेटच्या विरोधात टिप्पणीनंतर इम्रान खान यांच्यावर पीईएमआरएने ही बंदी घातली आहे.
इम्रान खान यांच्या अत्यंत जवळचे नेते शाहबाज गिल हे तुरुंगात आहेत. त्यांच्या समर्थनासाठी इम्रान खान यांनी इस्लामाबादमध्ये रॅली काढली होती. या रॅलीत इम्रान खान यांनी धमकी दिली होती. गिल यांच्यावर एका खासगी चॅनेलवरून देशाच्या विरोधात दुष्प्रचार केल्याचा आरोप केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. गिला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो तर फजलूर रहमान, नवाज शरीफ आणि राणा सनाऊल्लाह यांनाही न्यायायिक कारवाईचा सामना करावा लागू शकतो, असं इम्रान खान म्हणाले होते. गिल यांनी वक्तव्य केलं होतं म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर राजकीय सूडापोटी त्यांच्यावर कारवाई झाली आहे, असा आरोप इम्रान खान यांनी लगावला होता.
पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार आहे. इम्रान खान यांच्या या टीकेचा या नियुक्तीशी संबंध जोडला जात आहे. ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. एका नियुक्तीसाठी देशाला वेठीस धरलं जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.