लाहोर : आधी स्वीडन, नंतर कॅनडा आणि आता अफगाणिस्तान. तीन देश, मात्र कहाणी एकच. बलुचिस्तानचं भीषण, क्रूर वास्तव जगासमोर मांडणारे, आपल्या हक्कासाठी लढणारे, आक्रोश व्यक्त करणारे लोक अचानक गायब होतात. त्यानंतर अत्यंत संशयितरित्या त्यांचे मृतदेह सापडतात. ही कथा कुठल्याही चित्रपटाची नाही, तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आपल्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा नवा मार्ग आहे (Pakistan new tactic for balochistan ).
तीन दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे भाऊ आहेत, असं वक्तव्य करणाऱ्या करीमा बलोच या महिलेचा मृतदेह टोरंटो येथे मिळाला. त्यानंतर गुरुवारी (25 डिसेंबर) अफगाणिस्तानात बलुचस्तानच्या एका नेत्याच्या मुलावर अज्ञातांनी गोळी झाडली. या दोघांच्या हत्येच्या अगोदर मे महिन्यात पत्रकार साजिद हुसैन यांचा स्वीडनमध्ये मृतदेह मिळाला होता. ते मार्च महिन्यापासून बेपत्ता होते.
दहशतवाद्यांना आश्रय देणारं पाकिस्तानी सरकार आता विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी हिंसाचाराच्या नव्या मार्गाचा अवलंब करत आहे. बलुचिस्तानच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या छळाला वैतागून, आपला जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये आश्रय घेतला. मात्र, आता इम्रानचे ‘सुपारी किलर’ विविध देशांमध्ये जावून त्यांची हत्या करत आहेत.
‘द बलुचिस्तान पोस्ट’च्या माहितीनुसार, पाकिस्तानी सरकारच्या छळाविरोधात आवाज उठवणारे नेते हजरत गुल बलोच यांचा मुलगा नजीब बलोज गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. त्यानंतर गुरुवारी अफगाणिस्तानच्या निमरोज जिल्ह्यातील चखनासुर क्षेत्रात त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. हजरत गुल गेल्या कित्येक वर्षांपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी अफगाणिस्तानात आवाज उठवत आहेत. त्यांनी 190 च्या दशकात पाकिस्तानी सैन्याच्या छळाला कंटाळलेल्या अनेक कुटुंबांना आश्रय दिला होता.
हत्येमागी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा हाथ
बलुचिस्तानाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा दावा आहे की, यामागे पाकिस्तानी गु्प्तचर यंत्रणा ISIचा हाथ आहे. पाकिस्तानी सरकार बलुचिस्तानच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा कट रचत आहे. तीन दिवसांपूर्वी करिमा बलोच यांची हत्या झाली. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानात मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचे करिमा बलोचने जगाला सांगितलं होते. मात्र, त्यांचीदेखील हत्या करण्यात आली. पाकिस्तानी सरकारकडून विरोधकांची अशाप्रकारे मुस्कटबाजी होत असल्याने सोशल मीडियावर अनेकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : शोएब अख्तरची फेकूगिरी, काश्मीर काबीज करुन भारतावर हल्ला करु, ‘गजवा ए हिंद’चं स्वप्न