लाहोर: कोर्टाच्या आदेशानंतर पाकिस्तानच्या (pakistan) संसदेची कार्यवाही सुरू झाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ (shahbaz sharif) यांनी संसदेत आपलं म्हणणं मांडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी स्पीकर असद कैसर सोबत त्यांची शाब्दिक चकमक उडाली. आधी जे झालं ते ठिक आहे. पण आज संविधानासाठी उभं राहा. आज खऱ्या अर्थाने स्पीकरची भूमिका वठवा, असं शरीफ म्हणाले. मात्र, स्पीकरने पुन्हा एकदा गेम पलटला. तुमचं म्हणणं ठिक आहे. पण पाकिस्तानच्या विरोधात परदेशी षडयंत्र सुरू आहे. त्यावरही बोला, असं आव्हान स्पीकरने विरोधी पक्षनेत्याला केलं. त्यामुळे विरोधी पक्षनेते शरीफ चांगलेच भडकले. त्यामुळे संसदेत चांगलाच गोंधळ उडाला. अवघे 20 मिनिटे सभागृहाचे कामकाज झाले आणि त्यानंतर अखेर दुपारी 1 वाजेपर्यंत संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. संसदेचं काम स्थगित करण्यात आल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांनी तातडीने पक्षनेत्यांची बैठक बोलावली असून त्यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. अविश्वास प्रस्तावावर होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने ही चर्चा होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पीएमएल-एन पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी आज संसद नवा इतिहास रचत असल्याचं सांगितलं. आज पाकिस्तान नवा पंतप्रधान निवडणार आहे. इम्रान खान यांनी देशाचं नुकसान केलं आहे. इम्रान खान यांनी देशाचं भविष्य बर्बाद केलं आहे. मी विरोधकांना सलाम करतो. नुकतंच जे काही झालं तो संविधानाचा भंग होता. आम्ही सत्ता पक्षाची पोलखोल करू. कोर्टाच्या आदेशानुसार कार्यवाही झाली पाहिजे, असं शरीफ म्हणाले.
त्यानंतर इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते शाह महमूद कुरैशी यांनी आपलं म्हणणं मांडलं. आम्ही संसदेचा मुकाबला करण्यास तयार आहोत. देशात कायदा सर्वोच्च आहे, असं कुरैशी म्हणाले. त्याचवेळी विदेशी षडयंत्राच्या आरोपावर विरोधक भडकले. त्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे संसदेचं कामकाज दीड तासासाठी स्थगित करण्यात आलं.
दुर्देवाने पाकिस्तानचा इतिहास असंवैधानिक उल्लंघनाच्या प्रकरणाने भरलेला आहे. संविधानाच्या नुसार विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याला सामोरे जाणं ही सरकारची जबाबदारी आहे, असं कुरैशी म्हणाले.
संबंधित बातम्या: