इस्लामाबाद : पाकिस्तानात नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. त्याचा निकाल ही लागला आहे. मात्र पंतप्रधानपदाबाबत अजूनगही सस्पेंस कायम आहे. कोणत्यातच पक्षाकडे बहुमत नसल्याने त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे. इम्रान खान समर्थक खासदारांची संख्या सर्वाधिक असली तरी देखील ते बहुमताकडे पोहोचू शकत नाहीयेत. पण तरी देखील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाने उमर अयुब यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (PMLN) यांनी पंतप्रधानपदासाठी शाहबाज शरीफ यांचे नाव पुढे केले होते.
असद कैसर यांनी तुरुंगात बंद असलेल्या इम्रान खान यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. पक्षाचे सरचिटणीस उमर अयुब हेच पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे असद कैसर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, इम्रान खान ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत हेराफेरीच्या विरोधात देशव्यापी निषेध मोहिमेची तारीखही जाहीर करतील.
बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) पीएमएलएनला पाठिंबा जाहीर केला आहे. बिलावल भुट्टो म्हणाले होते की, त्यांच्या पक्षाला जनादेश मिळालेला नाही, त्यामुळे ते पंतप्रधानपदावर दावा करणार नाहीत. बिलावल म्हणाले होते की त्यांचा पक्ष पीएमएलएन सरकारला पाठिंबा देईल, परंतु त्यात सामील होणार नाही.
पीपीपी प्रमुख बिलावल भुट्टो यांनी त्यांचे वडील आसिफ अली झरदारी यांच्यासाठी राष्ट्राध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली आहे. झरदारी 2008 ते 2013 पर्यंत राष्ट्राध्यक्ष होते. ते पाकिस्तानचे 11 वे राष्ट्रपती होते. सध्याचे राष्ट्राध्यक्ष आरिफ अल्वी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. बिलावल यांनी अलीकडेच म्हटले होते की, त्यांनी आसिफ अली झरदारी यांना राष्ट्राध्यक्ष बनवण्याची इच्छा व्यक्त केली नाही कारण तो त्यांचा मुलगा आहेत, परंतु देश ज्या परिस्थितीतून जात आहे त्यामध्ये झरदारी अधिक चांगली भूमिका बजावू शकतात असा त्यांचा आणि पीपीपीचा विश्वास आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात नवा ट्विस्ट तयार झाला आहे.