लाहोर: वाढत्या महागाईला रोखण्यात अपयश आल्याने विरोधी पक्षाने पंतप्रधान इमरान खान यांना घेरलेले असतानाच आता इमरान यांच्या सरकारमधील काही पक्षांनीही त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे इमरान खान (Imran Khan) यांची खुर्ची धोक्यात आली आहे. विरोधकांनी इमरान यांच्या सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. या अविश्वास प्रस्तावावर (no-trust motion) उद्यापासून पाकिस्तानच्या (Pakistan) नॅशनल असेंबलीत चर्चा सुरू होऊन नंतर मतदान होणार आहे. त्यापूर्वीच इमरान खान हे पंतप्रधापदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इमरान खान आज संध्याकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. इमरान यांनी अचानकपणे देशवासियांना संबोधित करण्याचा निर्णय घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच त्यामुळेच इमरान खान यांच्या राजीनाम्याची शक्यता अधिकच बळावली आहे.
राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर इमरान खान यांनी आज दुपारी अडीच वाजता तातडीची बैठक बोलावली होती. ही बैठक अजूनही सुरू आहे. या बैठकीत इमरान खान सहकाऱ्यांशी चर्चा करून मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता देशवासियांशी संबोधित करताना हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच आज जरी त्यांनी मोठा निर्णय जाहीर केला नाही तरी आजच्या संबोधनातून ते काही संकेत देण्याची शक्यता आहे. त्यामुळेच इमरान यांच्या आजच्या संबोधनाकडे जगाचं लक्ष लागलं आहे.
एकीकडे इमरान सरकारवर राजकीय संकटाचे वादळ घोंघावत असतानाच पाकिस्तान-एमक्यूएमचे फरोग नसीम आणि अमीनुल हक यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
मी तुम्हाला सांगत होतो इथे गव्हर्नर राज सुरू करा. माझा संबंध केवळ पीटीआयशीच नाही तर तुमच्याशीही आहे. जीवात जीव असेपर्यंत मी तुमच्यासोबत राहील. मी राजकारण करत असेल नसेल करत, पण इमरान खान यांच्यासोबत मी पहाडासारखा उभा आहे. भिंती सारखा उभा आहे, असं शेख रशीद यांनी म्हटलं आहे. हे सर्व लोक परत तुमच्याकडे येतील. त्यावेळी तुम्ही त्यांना जवळ करू नका. तुम्ही माफ करता. माफ करण्याचा प्रश्नच नाही. काही काळाची गोष्ट आहे. मी आधीच सांगत होतो, संसद बरखास्त करा आणि निवडणुका घ्या, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
इम्रान खान सरकारची गच्छंती अटळ; अविश्वास ठरावापूर्वीच ‘एमक्यूएमने’ सरकारचा पाठिंबा काढला