लाहोर : जागतिक मंचावर पाकिस्तानकडून नेहमीच अल्पसंख्यांकांचे अधिकार आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात येतो. भारतात राहणाऱ्या अल्पसंख्याकांवर अत्याचार होतात, असा आरोप पाकिस्तानने अनेकदा केला आहे. पाकिस्तानच्या या दाव्यात अजिबात तथ्य नाही, हे सर्व जगाला माहितीय. तोच पाकिस्तान, हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत मूग गिळून बसतो.
पाकिस्तानकडून पद्धतशीरपणे त्याकडे डोळेझाक केली जाते. पाकिस्तान त्या बद्दल काही बोलत नाही. पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांक आहेत. पाकिस्तानात पुन्हा एकदा धर्मांतरचा विषय समोर आलाय.
मदरशात धर्मांतर
पाकिस्तानातील सिंध प्रांतात 10 हिंदू कुटुंबांच धर्मांतर करण्यात आलं. कमीत कमी 50 लोकांना इस्लाम स्वीकारण्यासाठी भाग पाडण्यात आलं. हिंदू कुटुंबांच्या धर्मांतरानंतर हिंदू कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. राज्य सरकारच धर्मांतरामध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला. ज्या कुटुंबाच धर्मांतर करण्यात आलं, ते सिंधच्या मीरपुरखास क्षेत्रात वास्तव्याला होते, असं द एक्सप्रेस ट्रिब्यूनने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. या कुटुंबांच एका मदरशात धर्मांतर करण्यात आलं.
धर्मांतरामध्ये पाकिस्तान सरकारचा रोल
मदरशाच्या देखभालीच काम करणाऱ्या कारी तैमूर राजपूत यांनी धर्मांतराची पुष्टी केली आहे. इथे 10 हिंदू कुटुंबातील 50 लोकांना आणण्यात आलं, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी इस्लाम कबूल केला. यात 23 महिला आणि एक 1 वर्षाची लहान मुलगी आहे. सिंध सरकारही यामध्ये सहभागी आहे. धार्मिक विषयाचे मंत्री मोहम्मद तल्हा महमूद यांचा मुलगा मोहम्मद शमरोज खान सुद्धा या धर्मांतर कार्यक्रमाला उपस्थित होता. त्यामुळे सिंध सरकारची मंजुरी होती. हे स्पष्ट होतं.
धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी
हिंदू कार्यकर्ते या सामूहिक धर्मांतराच्या घटनेमुळे चिंतेत आहेत. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारांविरोधात आवाज उठवणाऱ्या फकीर शिवा कुच्ची म्हणाले की, प्रांतीय सरकारच अशा प्रकारांमध्ये सहभागी असल्याच दिसून येतय. पाकिस्तानातील हिंदू कार्यकर्ते धर्मांतराविरोधात कठोर कायदा करण्याची बऱ्याच वर्षापासून मागणी करतायत.
सिंधमध्ये धर्मांतराची प्रकरण खूपच गंभीर आहेत, असं शिवा कुच्ची यांनी सांगितलं. “सरकारने यावर नियंत्रण आणलं पाहिजे. पण इथे उलटं आहे. मंत्र्याचा मुलगाच धर्मांतर कार्यक्रमात सहभागी झाला होता. हिंदुंसाठी हा चिंतेचा विषय आहे. आम्हाला असहाय्य वाटतं” असं शिवा कुच्ची म्हणाले.