पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात सोमवारी रात्री तुर्बत अंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आणि नौदलाच्या एअरबेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. मीडिया रिपोर्ट्नुसार पाकिस्तानी सुरक्षा पथकांनी नौदलाच्या एअरबेसवरील हल्ला यशस्वी होऊ दिला नाही. त्यांनी चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला. तुर्बत येथे पीएनएस सिद्दीकी हा पाकिस्तानी नौदलाच दुसरा मोठा एअरबेस आहे. दहशतवाद्यांनी या एअरबेसवर थेट गोळीबार सुरु केला. अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. प्रतिबंधित बलूचिस्तान लिबरेशन आर्मी, बलूचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) माजिद ब्रिगेडने तुर्बत नौदल एअरबेसवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मजीद ब्रिगेडने नेहमीच बलूचिस्तान प्रांतातील चिनी गुंतवणूकीचा विरोध केला आहे.
चीन आणि पाकिस्तान त्या भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा मनमानी पद्धतीने वापर करतात असाही माजीद ब्रिगेडचा आरोप आहे. द बलूचिस्तान पोस्टनुसार, हल्लेखोर एअरबेसमध्ये घुसल्याचा दावा BLA ने केला. त्याशिवाय या एअर बेसवर चिनी ड्रोन सुद्धा तैनात आहे. हल्ल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्याने टीचिंग हॉस्पिटल तुरबतमध्ये आणीबाणी जाहीर केली. सर्व डॉक्टर्सना तात्काळ ड्युटीवर बोलवून घेतलं.
आठवडाभरात हा दुसरा हल्ला
बीएलएच्या मजीद ब्रिगेडने तुर्बतमध्ये आठवडाभरात हा दुसरा हल्ला केला असून या वर्षातील तिसरा हल्ला आहे. याआधी 29 जानेवारीला ग्वादर येथे हल्ला झाला होता. 20 मार्चला पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर असाच हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी गोळीबार केला. अनेक स्फोट झाले. या लढाईत दोन पाकिस्तानी सैनिक आणि आठ दहशतवादी ठार झाले.
हा बेल्ट अँड रोड इनिशिएटिवचा (बीआरआय) भाग
पाकिस्तानच्या इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्सने दिलेल्या माहितीनुसार, आठ दहशतवाद्यांनी पोर्ट अथॉरिटी कॉलनीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा पथकांनी त्यांची योजना धुळीस मिळवली. ग्वादर बंदर चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरच्या दृष्टीने महत्त्वाच आहे. या बंदरावर चीनच नियंत्रण आहे. अब्जो डॉलर खर्च करुन रस्ते आणि ऊर्जा प्रकल्प सुरु आहेत. हा बेल्ट अँड रोड इनिशिएटिवचा (बीआरआय) भाग आहे.