नवी दिल्ली : पाकिस्तानातील (Pakistan) क्रूर ईश्वरनिंदा कायद्याची (Blasphemy Law) सध्या जगभरात सुरु आहे. एका श्रीलंकन नागरिकाच्या ईश्वर निंदेच्या आरोपाखाली नुकत्याच झालेल्या हत्येनं जगभरात खळबळ माजली आहे. हजारो लोकांनी लाथा-बुक्क्या आणि हाती येईल त्या वस्तूने त्या नागरिकाची अमानुषपणे हत्या केली. त्यानंतर रस्त्यावरच त्या व्यक्तीचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. या घटनेनंतर इम्रान खान (Imran Khan) यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जगभरातून टीका होत आहे. अशावेळी पाकिस्तानातील अजून एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओतून ईश्वरनिंदा प्रकरणी पाकिस्तानचा हिंसक आणि अराजक चेहरा जगासमोर आला आहे. हा व्हिडीओ इस्लामाबादेतील लाल मस्जिदचा असल्याचं सांगितलं जात आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, जर कुणी धर्माचा अपमान करतो तर त्याचा शीर धडावेगळं केलं पाहिजे, असं विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये कट्टरपंधी तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानचा नारा लाऊडस्पीकरवर ऐकायला मिळत आहे. अशाच प्रकारचा नारा श्रीलंकन नागरिक प्रियंता कुमारा दियावदाना यांची अमानुषपणे हत्या केली जात होती आणि त्यांचा मृतदेह भररस्त्यात पेटवून दिला जात होता त्यावेळी देण्यात येत होता. दरम्यान, पाकिस्तान सरकार आणि टीएलपीमध्ये नुकताच शांतता करार झाला होता. या करारापूर्वी पाकिस्तानमध्ये टीएलपीच्या कार्यकर्त्यांनी उच्छाद मांडला होता.
पाकिस्तानातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते गुल बुखारी यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. इस्लामाबादच्या लाल मस्जिदमधील विद्यार्थ्यांना ईश्वरनिंदा करणाऱ्या आरोपीचं शीर धडावेगळं करण्याची ट्रेनिंग दिली जात आहे. पाकिस्तानचा ‘कामयाब जवान’ (सक्सेसफुल यूथ) प्रोजेक्ट चांगल्याप्रकारे पुढे जात आहे. या व्हिडीओ शेकडो विद्यार्थिनी आणि महिला धार्मिक पेहरावात पाहायला मिळत आहे. या विद्यार्थिनींसोबत महिला पुतळ्याचं शीर कापताना दिसत आहेत. ‘कामयाब जवान’ पाकिस्तान सरकारची एक योजना आहे. ही योजना युवकांसाठी शिक्षण, रोजगाराला चालना देण्यासाठी आखण्यात आल्याचं सांगितलं जातं.
Students of Red Mosque Islamabad practising how to behead a person accused of blasphemy. Pakistan’s “kamyab jawan” (successful youth) project proceeding rather well. pic.twitter.com/fgZXXgL9bO
— Gul Bukhari (@GulBukhari) December 9, 2021
3 डिसेंबरला घडलेल्या धक्कादायक घटनेत कट्टरपंखी इस्लामी पार्टी तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानच्या नाराज समर्थकांनी एका कपड्याच्या कारखान्यावर हल्ला चढवला. या कारखान्याचे महाप्रबंधक प्रितंता कुमारा दियावदना यांना अमानुषपणे लाथा-बुक्क्या आणि काठीने मारहाण करुन त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह रस्त्यावरच जाळून टाकण्यात आला. दियावदना हे श्रीलंकेतील कँडी शहरातील रहिवासी होती. ते मागील सात वर्षापासून लाहोरपासून जवळपास 100 किलोमीटर दूर सियालकोट जिल्ह्यातील राजको उद्योक कारखान्यात जनरल मॅनेजर म्हणून काम करत होते.
या मॉब लिंचिंग प्रकरणात आतापर्यंत 800 पेक्षा अधिक लोकांविरोधात दहशतवादाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 118 जणांना अटक करण्यात आली असून त्यातील 13 प्रमुख संशयित आहेत. या घटनेनंतर पाकिस्तान सरकारवर दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी दबाव वाढत आहे.
इतर बातम्या :