लाहोर : पाकिस्तान (pakistan)प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. आर्थिक संकटापाठोपाठ पाकिस्तानमधील परकीय चलनाचा साठा संपत आला. पाकिस्तान (pakistan)व्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या गिलगिट-बाल्टिस्थानमध्ये पाकिस्तानच्या विरोधात आंदोलन (protest in pakistan)पेटलं आहे. या भागातील जनतेला भारतात समावेश हवा आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिघडली असताना इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने त्यांच्याविरोधात मोर्चा वळवला आहे. आता माध्यमांनीही पाकिस्तानला सल्ला देणे सुरु केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना द एक्स्प्रेस ट्रिब्यून या प्रतिष्ठीत दैनिकाने चांगला सल्ला दिला आहे. पाकिस्तानने काश्मीर प्रश्न सोडावा, त्याऐवजी देशातील परिस्थितीवर लक्ष द्यावे, असा सल्ला पत्रकार कामरान युसूफ यांनी लिहिलेल्या लेखात दिला आहे.
पत्रकार युसूफ यांनी नुकतीच लष्करप्रमुख जनरल कमर जावेद यांनी भेटले. याभेटीत त्यांनी भारत-पाकिस्तानसंदर्भात विस्तृत चर्चा केली. या भेटीत आतापर्यंत जाहीर न झालेल्या अनेक गोष्टींचा उल्लेख युसूफ यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, एप्रिल २०२१ मध्ये दोन्ही देशांचे संबंध चांगले करण्यासाठी मोदी यांनी पाऊल उचलले होते. त्यानुसार ते पाकिस्तान दौराही करणार होते. यासंदर्भात तत्कालीन डीजी लेफ्टनंट जनर फैज हमीद व भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यांत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. या चर्चेमुळे फेब्रुवारी २०२१ दरम्यान दोन्ही देशांनी सीमेवर संघर्षविरोम करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच मोदींचा दौरा निश्चित झाला होता. दोन्ही देशांचे व्यापारी संबंधही पुन्हा सुरु होणार होते.
मोदींचा दौरा का झाला रद्द :
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द होण्यास इम्रान खान याचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशी कारणीभूत असल्याचा खुलासा युसूफ यांनी लेखात केला आहे. त्यावेळी पाकिस्तानने काश्मीर विषय सोडल्यास जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा कुरेशी यांनी इम्रान यांना दिला होता.
काश्मीर प्रश्न पाकिस्तानने सोडावा :
भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९८ मधील वाजपेयी यांच्या दौऱ्यानंतर शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु तोपर्यंत भारत अमेरिकेच्या जवळ गेला होता. भारताच्या वाढत्या आर्थिक प्रभावामुळे भारताची काश्मीरसंदर्भातील भूमिका कठोर झाली. लेखाच्या शेवटी लिहिले आहे की, ‘भारत आर्थिक विकास करत असताना पाकिस्तान एकामागून एक संकटांचा सामना करत होता, हे आपण विसरू नये. त्यामुळेच अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारतासोबत शांतता राखणे आवश्यक आहे असे जनरल बाजवा यांनाही वाटले. या गोष्टीमुळे अनेकांना धक्का बसेल, पण पाकिस्तानला काश्मीरवरील चर्चा तूर्तास थांबवावी लागेल आणि आधी स्वत:च्या देशाची काळजी घ्यावी लागेल.
पीएम मोदींचे केले होते कौतूक :
यापूर्वी द एक्सप्रेस ट्रिब्यूनने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले होते. त्या लेखात म्हटले होते की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर भारताचा दर्जा उंचावला आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेला पाकिस्तान इतर देशांच्या मदतीवर अवलंबून होता, तर दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलरची झाली आहे.मोदी यांनी भारताला ब्रँड बनवले आहे. यापुर्वी हे काम कोणीच केले नव्हते. जगभरात भारताचा प्रभाव वाढला आहे. मोदींनी भारताला त्या टप्प्यावर आणले आहे जिथून भारताचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर भारताचा दर्जा वाढला आहे. भारत आपल्या परराष्ट्र धोरणाच्या जोरावर अमेरिकेसोबतच्या चांगले संबंध निर्माण केले आहे. त्याचा फायदा घेऊन जागतिक पटलावर भारत झपाट्याने उदयास येत आहे.