Diwali Holiday: अमेरिकेच्या या राज्यात दिवाळीनिमित्त राष्ट्रीय सुट्टी घोषित

| Updated on: Apr 27, 2023 | 3:48 PM

दिवाळी आता अमेरिकेत ही धुमधडाक्यात साजरी होणार आहे. कारण येथे एका राज्यात दिवाळी निमित्त राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Diwali Holiday: अमेरिकेच्या या राज्यात दिवाळीनिमित्त राष्ट्रीय सुट्टी घोषित
Follow us on

मुंबई : अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये दिवाळीला ( Diwali ) राष्ट्रीय सुट्टी ( National Holiday ) घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टी मिळणार आहे. पेनसिल्व्हेनियाचे सिनेटर निकिल सावळ यांनी बुधवारी ट्विट करून ही माहिती दिली. पेनसिल्व्हेनिया राज्याच्या सिनेटने संमतीने हा निर्णय घेतला आहे. दिवाळी हा सण राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केला आहे.

पेनसिल्व्हेनिया ( Pennsylvania ) या प्रांतात 2 लाख दक्षिण आशियाई लोकं राहतात. बहुतेक लोक दिवाळीचा सण थाटामाटात साजरा करतात. दिवाळीचा सण राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करून आम्हाला परस्पर बंधुभाव वाढवायचा आहे आणि संस्कृतींमधील एकोपा दृढ करायचा आहे, असे निकील यांनी म्हटले आहे. दरवर्षी दिवाळी हा दिव्यांचा सण लोकांच्या घरी, मंदिरात आणि सार्वजनिक ठिकाणी साजरा केला जातो, असे ते म्हणाले.

अंधार दूर करून प्रकाश पसरवणारा हा सण आहे, त्यामुळे याला अधिकृत मान्यता देणे गरजेचे होते. सिनेटर ग्रेग रॉथमन आणि निकिल सावल यांनी ही अधिकृत राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. हिंदू मान्यतेनुसार, या दिवशी 14 वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम माता सीतेसह अयोध्येला परतले होते.

प्रभू राम अयोध्येत परतल्याबद्दल दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. व्हाईट हाऊसमध्येही दिवाळीला दिवे लावले जातात आणि राष्ट्राध्यक्षांकडून लोकांना शुभेच्छा दिल्या जातात. यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळी साजरी होणार आहे.