भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पाकिस्तानी हवाईक्षेत्राचा (एअरस्पेश) वापर केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. जिओ न्यूजने पाकिस्तान नागरिक उड्डान मंत्रालयाच्या सूत्रांनी ही बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड दौऱ्यावरुन भारतात परत येत असताना तब्बल 46 मिनिटे पाकिस्तानी हवाईक्षेत्रात होते, असा दावा या वृत्तात केला आहे.
पाकिस्तानी नागिरक उड्डान मंत्रालयानुसार, नरेंद्र मोदी यांचे विमान सकाळी 10:15 वाजता पाकिस्तानी हवाईक्षेत्रात दाखल झाले. त्यानंतर तब्बल 46 मिनिटे हे विमान पाकिस्तानी हवाई क्षेत्रात होते. सकाळी 11:01 मिनिटांनी पाकिस्तानी हवाईक्षेत्रातून हे विमान बाहेर पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान चित्राल मार्गाने पाकिस्तानी एअरस्पेशमध्ये दाखल झाले. इस्लामाबाद, लाहोर येथील हवाई क्षेत्रात हे विमान होते.
पाकिस्तानच्या प्रमुख वृत्तपत्र डॉनने आपल्या वृत्तात लिहिले आहे की, भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जात असताना सदिच्छा संदेश देण्याची परंपरा पाळली नाही. ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणावाच्या चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. डॉनने विमान वाहतूक मंत्रालयातील एका सूत्राचा हवाला देत सांगितले की, सदिच्छा संदेश पाठवणे ही एक परंपरा आहे आणि सक्ती नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनची राजधानी कीव जाताना पोलंडची राजधानी वारसॉ येथे गेले होते. कीवमध्ये त्यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्की यांची भेट घेतली. मोदी यांच्या या दौऱ्याची चर्चा जगभरातील माध्यमांनी घेतली. या दौऱ्यावरुन परत येत असताना मोदी यांच्या विमानाने पाकिस्तानी हवाईमार्गातून प्रवास केला.
जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या 44 जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मोदी सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये काश्मीरचा असलेला विशेष दर्जा आणि कलम 370 रद्द केले होते. त्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत असलेला सर्व द्विपक्षीय व्यापर थांबवला होता.