बांगलादेशात मोठं सत्तांतर झालं आहे. देशातील सत्ता आर्मीने ताब्यात घेतलं आहे. तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन भारतात पलायन केलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. ठिकठिकाणी जाळपोळ, हाणामारी सुरू आहे. त्यामुळेच पंतप्रधानांना आपल्याच देशातून पलायन करावं लागलं आहे. शेख हसीना यांना अवघ्या 45 मिनिटात देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. विशेष म्हणजे शेख हसीना यांना दुपारपर्यंत सलाम ठाकणाऱ्यांनीच त्यांना देश सोडण्याचं फर्मान बजावलं आहे.
बांगलादेशच्या लष्कराचे प्रमुख जनरल वकार उज उमान यांनी देशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. तर बांगलादेशच्या स्थानिक मीडियानुसार, हसीना यांनी भारताचा आश्रय घेतला आहे. तर एएफपी या वृत्त एजन्सीच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना या सुरक्षित ठिकाणी पोहोचल्या आहेत. बांगलादेशातील प्रमुख वृत्तपत्र ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, शेख हसीना या त्यांची लहान बहीण शेख रेहाना यांच्यासोबत भारतात गेल्या आहेत.
बातमीनुसार, पंतप्रधान शेख हसीना बंग भवन ( पंतप्रधानांचे निवासस्थान) येथून लष्कराच्या हेलिकॉप्टरने दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास बहीण शेख रेहाना हिच्यासोबत सुरक्षित ठिकाणी रवाना झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या भारतातील पश्चिम बंगालमध्ये येणार होत्या. शेख हसीना यांना देश सोडण्यापूर्वी देशाला संबोधित करायचं होतं. त्यांना भाषण रेकॉर्ड करायचं होतं. पण परिस्थिती अशी काही झाली की त्यांना भाषण न करताच देश सोडावा लागला आहे. शेख हसीना यांना लष्कराने देश सोडण्यासाठी अवघे 45 मिनिटे दिली होती. 45 मिनिटात देश सोडा. भाषण वगैरे रेकॉर्ड करू नका, असं फर्मानच बजावलं गेलं होतं. त्यामुळे हसीना यांनी अत्यंत घाई गडबडीत देश सोडण्याचा निर्णय घेतला.
या दरम्यान, लष्कराचे प्रमुख वकार उज जमान यांनी देशाला संबोधित केलं. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन देशातील घडामोडींची माहिती दिली. त्यांनी नागरिकांना हिंसा रोखण्याचं आवाहन केलं. तसेच मृतांच्या कुटुंबायांशी न्याय केला जाईल, असं सांगितलं. तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जाईल. फक्त तुम्ही संघर्ष करू नका. आज आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे, असं जमान म्हणाले.
आज आंदोलक प्रचंड हिंसक झाले होते. या आंदोलकांनी बांगलादेशाचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर्रहमान यांच्या मूर्तीची तोडफोड केली. या संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आंदोलक मूर्तीवर चढून हातोड्याने प्रहार करताना दिसत आहेत. यावरून बांगलादेशाची स्थिती किती भयानक असेल याची कल्पना येते. शेख हसीना या मुजीबुर्रहमान यांच्या कन्या आहेत.