इस्रायलवर प्रत्युत्तराच्या हल्ल्यासाठी तयार रहा, इराणच्या प्रमुखांच्या सूचना

| Updated on: Nov 01, 2024 | 4:03 PM

इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांनी देशाच्या इस्रायलवर प्रत्युत्तराच्या हल्ल्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यात इराणमध्ये इस्रायलने हवाई दलाच्या मदतीने हल्ले करत इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केले होते. आता या हल्ल्यानंतर खामेनी यांनी बदला घेण्याचा मार्ग निवडला आहे.

इस्रायलवर प्रत्युत्तराच्या हल्ल्यासाठी तयार रहा, इराणच्या प्रमुखांच्या सूचना
Follow us on

इराणकडून इस्रायलवर मोठा हल्ल्याची शक्यता आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी देशाच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला इस्रायलवर हल्ल्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यू यॉर्क टाईम्सने तीन इराणी अधिकाऱ्यांचा हवाला देत  हा दावा केलाय. गेल्या आठवड्यात इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणला झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर खमेनी यांनी हा निर्णय घेतलाय. इराणी अधिकाऱ्यांचा दावा आहे की, बैठकीत खमेनी यांनी इस्रायलच्या हल्ल्यांना उत्तर देण्यावर भर दिला आहे. इस्रायलच्या हल्ल्याकडे दुर्लक्ष करून पाऊल मागे घेणे म्हणजे इराणचा पराभव मान्य करण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे इराणला इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर द्यायचे असून त्यासाठी तयारी करायला हवी. इराण हल्ला करुन इस्रायलच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करु शकते.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या आधी किंवा नंतर म्हणजेच ५ नोव्हेंबरच्या आधी किंवा नंतर इराणकडून प्रत्युत्तराचे हल्ले होऊ शकतात. कारण हा संघर्ष वाढू नये यासाठी अमेरिकेचा दबाव आहे. आता इराणने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होईपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्याचे देखील मानले जात आहे. काही रिपोर्ट्स नुसार इराणचा हल्ला याआधीही होऊ शकतो. याबाबत अधिकृतरित्या काहीही माहिती समोर आलेली नाही.

इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या एक वर्षापासून तणाव आहे. एप्रिलमध्ये दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागली होती. यानंतर काही महिने परिस्थिती शांत होती. पण नंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा परिस्थिती बिकट झाली. लेबनॉनमध्ये इस्रायली लष्कराने कारवाई सुरु केल्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर सुमारे 180 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. त्यानंतर तीन आठवड्यांनंतर, 26 ऑक्टोबर रोजी इस्रायली हवाई दलाने इराणवर हल्ला केला. आता पुन्हा एकदा इराणने कारवाईची धमकी दिली ​​आहे.

इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, इराणला या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे कमांडर होसेन सलामी यांनी देखील बदला घेण्याचे आवाहन केले आहे. पण इराणकडून कोणताही हल्ला झाल्यास त्यांच्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे इस्रायली अधिकाऱ्यांनी आधीच इशारा दिला आहे.