रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे इतर देशांमध्ये ही भीतीचे वातावरण आहे. युक्रेनसोबतचे युद्ध संपल्यानंतर पुतिन चार युरोपीय देशांवर हल्ला करू शकतात, असा इशारा एका तज्ज्ञाने दिला आहे. संरक्षण आणि सुरक्षा तज्ज्ञ निकोलस ड्रमंड यांच्या मते पुतिन यांची रशियन साम्राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. हे युरोपीय देशांसाठी अडचणीचे ठरु शकते. कारण युक्रेनवरील ‘विजया’नंतर पुतिन यांचा त्यांच्यावर डोळा असू शकतो.
पुतिन यांच्या सैन्याने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. डेली एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, निकोलस ड्रमंड यांनी म्हटले की, एस्टोनिया, लॅटव्हिया आणि लिथुआनिया (बाल्टिक देश), मोल्दोव्हा आणि अगदी आफ्रिकेतील काही भागांना रशियन सैन्याकडून लक्ष्य केले जाऊ शकते. ते म्हणाले की, ‘पुतिन हा धोकादायक माणूस आहे. त्याला रशियाला पुन्हा महासत्ता बनवायचा आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘मला वाटत नाही की ते बाल्टिक देशांवर हल्ला करतील. बाल्टिकमध्ये नाटो सैन्य आहे, म्हणून रशियन हल्ल्याने कलम 5 सक्रिय होईल. यामुळे नाटो देशांना रशियावर हल्ला करण्यास भाग पाडले जाईल. ते मोल्दोव्हामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकतात. होय, ते आफ्रिकेतही काहीतरी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. तेथील क्षेत्रे काबीज करू शकतात.
रशियाने सोमवारी दक्षिण आणि पूर्व युक्रेनमधील शहरांवर ग्लायड बॉम्ब, ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. यामध्ये किमान सहा जणांचा मृत्यू झाला. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की म्हणाले की, रशियाने अलीकडच्या काही दिवसांत हल्ले वाढवले आहेत. युक्रेनमधील लोकांना परावृत्त करण्यासाठी रशियाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. युक्रेनमधील युद्धाला 1000 दिवस झाले आहेत. झेलेन्स्की म्हणाले, ‘रशिया दररोज, प्रत्येक रात्री अशीच दहशत पसरवतोय. नागरी गोष्टींना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश धोरणात बदल होण्याची वाट पाहत आहेत.