सहा वर्षांत पाचव्यांदा रशियाच्या अध्यक्षपदी पुतिन यांची निवड झाली आहे. त्यानंतर त्यांनी जग तिसऱ्या महायुद्धापासून केवळ एक पाऊल दूर असल्याचा इशारा दिला आहे. पुतिन यांच्या या इशाऱ्यानंतर जगात एकच खळबळ उडाली आहे. कारण त्यांच्याकडे जगातील सर्वाधिक अण्वस्त्रे आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आहेत. त्यांना तिसऱ्यांदा हा इशारा दिला आहे. पुतिन म्हणाले की, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी संघटना नाटोचे तज्ज्ञ आधीच युक्रेनमध्ये आहेत आणि रशियासोबतच्या युद्धात युक्रेनियन सैन्याला सल्ला देत आहेत. जर पाश्चिमात्य देशांनी आपले सैनिक युक्रेनमध्ये लढण्यासाठी पाठवले तर तिसरे महायुद्ध सुरू होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर 1962 च्या क्युबन मिसाईल संकटानंतर पुतिन यांचा हा इशारा सर्वात गंभीर मानला जात आहे.
1962 मध्ये अमेरिकेजवळील क्युबामध्ये क्षेपणास्त्रे तैनात करण्याच्या मुद्द्यावरून तत्कालीन सोव्हिएत युनियन आणि अमेरिका आमने-सामने आले होते. पुतिन यांनी सध्या युक्रेनमध्ये अण्वस्त्रे वापरण्याची गरज नाकारली आहे.
अध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर पुतिन म्हणाले की, आधुनिक जगात सर्व काही शक्य आहे. जे काही घडत आहे त्यामुळे तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे. कदाचित हे कोणाच्याही हिताचे नसेल. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युक्रेनमध्ये नाटो सैन्य पाठवण्याचे संकेत दिल्यानंतर रशियाच्या अध्यक्षांची ही प्रतिक्रिया आली आहे. रशियन लोकांना थेट हल्ल्यापासून वाचवण्यासाठी युक्रेन सीमेवर बफर झोन तयार करण्याचा विचार करत असल्याचे पुतिन यांनी सांगितले आहे.
अमेरिकेत होत असलेल्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष नाहीत. तिथे विरोधी पक्षनेते डोनाल्ड ट्रम्प यांना त्रास देण्यासाठी सरकारी शक्तीचा वापर केला जात आहे. अमेरिकेत जे घडत आहे त्यावर संपूर्ण जग हसत आहे – ही लोकशाही नाही. दिवंगत नेते ॲलेक्सी नवलनी यांचे प्रथमच सार्वजनिकरित्या नाव घेत पुतिन म्हणाले की, त्यांच्या अनपेक्षित मृत्यूमुळे त्यांना दु:ख झाले आहे. कैद्यांच्या बदल्यात त्यांची सुटका करण्याचा प्रस्ताव सरकारने फेब्रुवारीमध्ये मंजूर केला होता.