लाहोर: इम्रान खान (imran khan) यांची सत्ता जाताच त्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली आहे. इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठराव (no trust vote) पास होताच त्यांचे प्रवक्ते डॉ. अर्सलान खालिद (arsalan khalid) यांच्या घरावर छापेमारी सुरू झाली आहे. रात्रीपासून ही छापेमारी सुरू आहे. एवढेच नव्हे तर खालिद यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोनही जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काल पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर रात्री उशिरा या ठरावावर मतदान झालं. यावेळी इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला होता. त्यानंतर असेंबलीच्या स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरनेही राजीनामा दिला. त्यामुळे सीनियर सदस्याने सभागृहाचं कामकाज चालवून अविश्वास प्रस्तावावर मतदान घेतलं. यावेळी इम्रान यांच्याविरोधात 174 मते पडली आणि इम्रान खान यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले.
इम्रान खान यांच्या पीटीआय या पक्षाने स्वत: ट्विट करून अर्सलान खालिद यांच्या घरावर छापेमारी करण्यात आल्याची माहिती दिली आहे. अत्यंत धक्कादायक घटना आहे. डॉ. अर्सलान खालिद यांच्या घरावर छापा मारण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांचे फोनही जप्त करण्यात आले आहेत, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या टिप्पणीवरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अर्सलान यांनी कधीच सोशल मीडियावरून एक शब्दही उच्चारला नाही, तरीही सोशल मीडियावर टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र, छापेमारी नेमकी कशामुळे करण्यात आली याचं अधिकृत कारण देण्यात आलेलं नाही.
दरम्यान, इम्रान खान, फवाद चौधरी आणि शाह महमूद यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तिघांचीही नावे एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर 11 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. तसेच इम्रान खान यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आले आहे.
सरकार कोसळल्यानंतर इम्रान खान यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. या मिटिंगमध्ये पुढील रणननीती ठरवली जाणार आहे. त्यामुळे इम्रान खान आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Extremely Disturbing News:
Ex Focal person on PM @ImranKhanPTI on Digital, Dr. @arslankhalid_m‘s home has been raided & they have taken all phones from his family!
He has never abused anyone on social media & never attacked any institutions. @FIA_Agency please look into it
— PTI (@PTIofficial) April 10, 2022
संबंधित बातम्या:
Pakistan Political Crisis : इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता ! पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे आदेश