तुम्ही कितीही शक्तीशाली बना, तुमच्याकडे अत्याधुनिक सोयी-सुविधा, एकाहून एक सरस उपकरणं, अत्याधुनिक शस्त्रास्त्र असली, तरी निर्सगासमोर कोणाचच काही चालत नाही. निर्सग हाच सर्व शक्तीमान आहे. सध्या सुपरपॉवर अमेरिका याचा अनुभव घेत आहे. अमेरिका आज पृथ्वीवरचा सर्वात प्रगत देश आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधा, यंत्रणांनी सज्ज असलेला हा देश. पण मागच्या सहा दिवसांपासून जंगलात पेटलेल्या वणव्यासमोर हा देश हतबल आहे. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील एक सुंदर राज्य या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे. कॅलिफोर्नियात बराचसा भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलात पेटलेला वणवा लॉस एंजेलिस शहरापर्यंत पोहोचला. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात भीषण वणवा आहे. जवळपास 40 किलोमीटरच्या क्षेत्रात ही आग पसरलेली आहे. यात 12 हजारपेक्षा जास्त इमारती जळून खाक झाल्या आहेत. लॉस एंजेलिस हे हॉलिवूड स्टार्ससाठी ओळखलं जातं. अनेक सुपरस्टार अभिनेते, अभिनेत्रींची आलिशान घरं या आगीत जळून खाक झाली आहेत. कॅलिफोर्नियात लॉस एंजेलिस शहर आहे. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने लॉस एंजेलिसच्या आगीला अजून भीषण बनवलं आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत होरपळून कमीत कमी 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
कॅलिफोर्नियाच्या जंगलात वणवा पेटणं हे अजिबात नवीन नाहीय. पण सध्याची आग अत्यंत भीषण असून ती वेगाने पसरतेय. महत्त्वाच म्हणजे हिवाळ्यात हा वणवा भडकला आहे. कॅलिफोर्नियात या ऋतुमध्ये सहसा वणवा पेटत नाही. मग, कॅलिफोर्नियाच्या जंगलात हा वणवा आता का भडकला? हा वणवा कशामुळे पेटला ते अजून स्पष्ट झालेलं नाही. पण वीज वाहून नेणाऱ्या उच्च क्षमतेच्या वीजेच्या तारा आणि सोसाट्याचा वारा यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता आहे. पण हा वणवा पेटण्यासाठी तीन अन्य कारणं सुद्धा आहेत. 2022 आणि 2023 हे मागचे दोन हिवाळे लॉस एंजेलिससाठी ओलसर होते. सहसा असं होत नाही, हे असामान्य आहे. त्यामुळे झाडा, झुडूपांना अंकुर फुटला. पण दक्षिण कॅलिफोर्नियासाठी हा हिवाळा कोरडा होता. सर्व वनस्पती सुकल्या होत्या. हा कोरडेपणा वणव्याच्या स्थितीसाठी अनुकूल होता.
सँटा एना वारं वाहण कॉमन पण यावेळी वेगळं काय?
नासानुसार, मागच्या ऑक्टोंबरपासून दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये नगण्य स्वरुपाचा पाऊस झाला. हवामान शास्त्रज्ञ डॅनियल स्वॅन यांच्यानुसार, या भागात हिवाळ्याची कोरडी सुरुवात झाली. उदहारणार्थ 1 ऑक्टोंबरपासून एअर पोर्टवर 0.03 इंच पावासाची नोंद झाली. या सीजनमध्ये कॅलिफोर्नियात सँटा एना हवा वाहणं सामान्य बाब आहे. पण यात एकच अनपेक्षित बाब आहे, ती म्हणजे सँटा एना वाऱ्याचा वेग. प्रचंड वेगाने सँटा एना वारे वाहत आहे, कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिसमध्ये महाप्रचंड नुकसान झालय ते या वाऱ्यामुळेच. कारण हा वारा ही आग पसरवत आहे.
जंगलात वणवा पेटण्याच नैसर्गिक कारण काय?
जंगलात आग लागण्यामागे नैसर्गिक कारणं सुद्धा असतात. यात वीज कोसळणं हे एक प्रमुख कारण ठरतं. त्यामुळे जंगलात आग लागू शकते. जंगलात कोरड्या पडलेल्या भागावर वीज कोसळल्यास वणवा भडकू शकतो. त्याशिवाय ज्वालामुखीचा स्फोट हे सुद्धा आग लागण्यामागच एक कारण आहे.
आगीला कारण ठरलेल्या या वाऱ्याची निर्मिती कशी झाली?
ऑक्टोंबर ते जानेवारी दरम्यान ग्रेट बेसिनच्या वाळवंटात उच्चदाब तयार होतो. हा उच्च दाबाची सिस्टिम वारं पश्चिमेला किनाऱ्याकडे घेऊन येते. हा वारं समुद्राकडून जमिनीकडे वाहण्यापेक्षा वेगळा प्रकार आहे. हे वारं सध्या सिएरा, नेवाडा आणि सँटा एना डोंगर रागांमधून वाहत आहे. यात दमटपणा नाहीय. डोंगर रांगामधून हे वार वाहत असल्यामुळे त्याचा प्रचंड वेग आहे. सध्या हे वारं दक्षिण कॅलिफोर्नियावर घोघावत आहे. हे वारं वेगवान, कोरडं आणि उबदार आहे. त्यामुळेच लॉस एंजेलिसमध्ये आगीच्या ज्वाळा भडकत आहेत. ही आग कोरड्या पडलेल्या वनस्पती, वीजेच्या केबल्स, लाकडी घर यांना गिळंकृत करत आहे.
वातावरण बदलाचा परिणाम
संपूर्ण जगावर क्लायमेंट चेंज म्हणजे वातावरण बदलाचा अत्यंत वाईट परिणाम होतोय. वातावरण इतकं तीव्र होतय की, त्यामुळे नुकसान वाढत चाललं आहे. तज्ज्ञांनी सांगितलय की, कॅलिफोर्नियात जंगलांना आगी लागण्याचा सीजन वाढत चालला आहे. जर्नल नेचरमध्ये 2021 मध्ये एक स्टडी रिपोर्ट प्रकाशित झालेला. त्यानुसार, वणवा ज्या ऋतुमध्ये पेटतो तो कालावधी वाढत चालला आहे. आगीची तीव्रता सुद्धा वाढतेय.
आग विझवण्यासाठी किती विमानं, हेलिकॉप्टर तैनात?
सँटा एना वाऱ्याच्या वेगाने कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिसमध्ये स्थिती बिकट बनवून ठेवली आहे. ही आग विझवण्यासाठी पाणी आणि पिंक फायर रिटार्डेंट्चा वापर केला जातोय. नऊ मोठी रिटार्डंटची फवारणी करणारी विमानं आणि 20 पाणी टाकणारी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. अमेरिकेच्या जंगल विभागाने ही माहिती दिली. द न्यू यॉर्क टाइम्सने ही बातमी दिली. पिंक फायर रिटार्डंटचा वापर हे अमेरिकेत अजिबात नवीन नाहीय. अनेक दशकांपासून अमेरिकेत आग विझवण्यासाठी या रिटार्डंटचा वापर होतोय. यावर केलेल्या संशोधनातून हे रिटार्डंट किती परिणामकारक आहेत? आणि यामुळे पर्यावरणाच होणारं संभाव्य नुकसान हे दोन मुद्दे उपस्थित झाले आहेत.
रिटार्डंट म्हणजे काय?
फायर रिटार्डंटमध्ये केमिकल म्हणजे रसायन असतं. आग विझवणं आणि पसरण्यापासून रोखण्यासाठी ही रिटार्डंट वापरली जातात. ही वेगवेगळ्या प्रकारची रिटार्डंट आहेत. पण जंगलातील वणव्यासाठी अमेरिकेत यंत्रणा फॉस-चेक ब्रँडच रिटार्डंट वापरतात. यात अमोनियम फॉसफेट असतं.
रिटार्डंट फवारणीमुळे काय नुकसान?
विमानातून फायर रिटार्डंटची फवारणी परिणामकारक ठरत नाही, असं पर्यावरणतज्ज्ञ सांगतात. ही आग विझवण्याची महागडी पद्धत असून यामुळे नदी आणि ओढ्यांमध्ये प्रदूषण वाढतं. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी 2024 मध्ये यावर संशोधन केलं. फॉस-चेकमध्ये विषारी धातू आढळून आले. 2009 पासून अंदाजित 8 लाख 50 हजार पाऊंड रिटार्डंट पर्यावरणामध्ये आहे. लॉस एंजेलिस टाइम्सने हे वृत्त दिलय.
रिटार्डंटमुळे कुठले आजार होऊ शकतात?
या विषारी धातूमध्ये क्रोमियम आणि कॅडमियम हे घटक असतात. त्यामुळे कॅन्सर, किडनी आणि लिव्हरचा आजार होऊ शकतात. त्यांचा पर्यावरणावर सुद्धा घातक परिणाम होतो. हे रिटार्डंट जेव्हा पाण्यात मिसळतं, तेव्हा विषारी धातूंमुळे जलचरांचा आयुष्य धोक्यात येतं. फॉस-चेक हे किती परिणामकारक आहे हे अजून स्पष्ट नाहीय. मोठी आग विझवण्यासाठी वेगवेगळे जे उपाय असतात, त्यातला हा एक आहे. त्यामुळे आग विझण्याच सर्व श्रेय फॉस-चेकला देता येणार नाही. वणवा पेटलाय तो प्रदेश कसा आहे? तिथे वातावरणाची स्थिती कशी आहे? त्यावरुन रिटार्डंट फवारणी किती परिणामकार आहे हे ठरवता येतं असं जंगल अभ्यासकांनी सांगितलं.
हवामान विभागाचा इशारा काय?
आग प्रभावित भागामध्ये सध्या हलकं वार वाहत आहे. पण फायटर फायटर्सच्या अडचणी वाढवणारं सेंटा एना वारं पुन्हा परतू शकतं, असं इशारा हवामान विभागाने दिला आहे. याच हवेमुळे आग पसरली. त्यामुळे लॉस एंजेलिसमधील शहरी वस्तीचा बराचस भाग उद्धवस्त झाला आहे.
किती हजार इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी?
लॉस एंजेलिसमध्ये मागच्या आठ महिन्यात विशेष पाऊस झालेला नाही. आगीमुळे तिथल्या इंटरस्टेट हायवे 405 ला धोका आहे. 145 वर्ग किलोमीटरच क्षेत्र या आगीने व्यापलं आहे. हजारो लोकांना घर रिकामी करण्यास सांगण्यात आलं आहे. शहराच्या उत्तरेला 40 किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या आगीमध्ये जळून अनेक इमारती भस्मसात झाल्या आहेत. 12 हजारपेक्षा जास्त इमारती या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.