Russia-Ukraine War : पुतिन यांनी भारताला शांतीदूत ठरवलं, पण त्याचवेळी अमेरिकेला कडक शब्दात इशारा

| Updated on: Sep 06, 2024 | 9:51 AM

Russia-Ukraine War : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन बरोबर सुरु असलेल्या युद्धात भारताची मध्यस्थता मान्य असल्याचे संकेत दिले आहेत. पण त्याचवेळी रशियाकडून अमेरिकेला अत्यंत कठोर शब्दात इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेने खेळ असाच सुरु ठेवला, तर मोठी किंमत चुकवावी लागेल, जागतिक स्थिरतेसाठी ते चांगलं नसेल.

Russia-Ukraine War : पुतिन यांनी भारताला शांतीदूत ठरवलं, पण त्याचवेळी अमेरिकेला कडक शब्दात इशारा
Russia-Ukraine War
Follow us on

रशियाने युक्रेन मुद्यावर अमेरिकेला अत्यंत कठोर शब्दात इशारा दिला आहे. युक्रेन युद्धात रेड लाइन कुठली? हे अमेरिकेला समजलं पाहिजे असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव म्हणाले. “अमेरिकेची रशियाबद्दलची संयमाची भावना हरवत चालली आहे. दोन्ही देशांच्या संबंधांसाठी हे चांगलं नाही” असं सर्गेई लावरोव ‘तास’ (TASS) या रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठ्यात अमेरिकेने रेड लाइन ओलांडली आहे असा आरोप लावरोव यांना इंटरव्यूमध्ये केला. “आमच्या रेड लाइनशी खेळता येणार नाही हे अमेरिकेला समजलं पाहिजे. अमेरिकेला सुद्धा हे माहितीय. अमेरिकेकडून युक्रेनला होणाऱ्या मदतीमुळे अमेरिका-रशिया संबंधात आणखी तणाव वाढेल. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात” असा रशियन परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे.

“अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्र पुरठवा सुरु ठेवला ते मागे हटले नाहीत, तर रशिया सुद्धा आपल्या हिताच्या रक्षणासाठी कठोर पावलं उचलेलं. जागतिक स्थिरतेच्या दृष्टीने विचार करावा” असं लावरोव म्हणाले. अलीकडच्या काही महिन्यात युक्रेनने अमेरिकन शस्त्रांचा उपयोग करुन रशियाच्या आत हल्ले केले आहेत. त्यामुळे रशियाच मोठ नुकसान झालं आहे. असे हल्ले वाढतच चालले आहेत. काही दिवसांपूर्वी युक्रेनने रशियन सीमेमध्ये घुसून कुर्स्क शहर ताब्यात घेतलं होतं. रशिया या युद्धात पिछाडीवर आहे, असा संदेश त्यामुळे जागतिक स्तरावर गेला.

…म्हणून रशियाला संपूर्ण यश नाही

2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला. सुरुवातीला 8-10 दिवसात या युद्धाचा निकाल लागेल असं वाटलं होतं. पण दोन वर्ष होत आली, तरी अजूनही हे युद्ध सुरुच आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर युक्रेनला अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी सैन्य, आर्थिक रसद पुरवली. अमेरिकी आणि युरोपियन देशांच्या मदतीमुळे रशियाला या युद्धात अजून पूर्ण यश मिळू शकलेलं नाही.

पुतिन भारताबद्दल काय म्हणाले?

“युक्रेन सोबत सुरु असलेल्या संघर्षाच्या मुद्यावर भारत, चीन आणि ब्राझीलच्या संपर्कात आहोत. ते प्रामाणिकपणे हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करतायत” असं रशियन राष्ट्रपती व्लादिमीप पुतिन म्हणाले. “आम्ही आमचे मित्र आणि भागीदारांचा आदर करतो. चीन, ब्राझील आणि भारत या तिन्ही देशांना प्रामाणिकपणे या संघर्षावर तोडगा काढायचा आहे. मी या मुद्यांवर माझ्या सहकाऱ्यांच्या संपर्कात आहे” असं पुतिन म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या ऐतिहासिक युक्रेन दौऱ्यानंतर दोन आठवड्यांनी पुतिन यांनी ही टिप्पणी केली आहे.