हमास प्रमुख इस्माईल हनियाची इराणमध्ये हत्या झाल्यानंतर इराणने या हत्येचा बदला घेणार असल्याची घोषणा केली आहे. एक पाहुणा आपल्या देशात मारला गेला यामुळे इराणच्या हे जिव्हारी लागलं आहे. इस्रायलविरोधात तो अधिक आक्रमक झालाय. इराणने इस्रायलला युद्धाची धमकी दिली होती. इराण कधीही हल्ला करू शकतो त्यामुळे इस्रायल देखील अलर्ट आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी देखील याबाबत संकेत दिले होते. गेल्या १५ दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यातच आता अशी बातमी समोर येते की, रशियाने तेहरानला प्रगत हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडार पुरवण्यास सुरुवात केली आहे असा दावा न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या अहवालात केला आहे. अहवालातील सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, इराणने इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली असताना रशियाने ही डिलिव्हरी सुरू केली आहे. मात्र, हवाई संरक्षण यंत्रणेचे नाव समोर आलेले नाही. रशिया तेहरानला S-400 पुरवत असल्याची शक्यता आहे.
इराणने हवाई संरक्षण प्रणालीसाठी विनंती केल्याचे वृत्त आहे. आता रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगु यांनी तेहरानला भेट दिल्यानंतर, दोन इराणी अधिकाऱ्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला पुष्टी केली आहे. रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगु यांनी सोमवारी इराणचे नवे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांची भेट घेतली. पेजेश्कियान यांनी इस्माईल हनियाच्या हत्येबाबत इस्रायलच्या हल्ल्याबाबत चर्चा केली. इराणच्या प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की इराणला कोणत्याही प्रकारे या प्रदेशात युद्ध वाढवायचे नाही, परंतु इस्रायलला त्याच्या गुन्ह्या आणि उद्दामपणाचे उत्तर द्यावे लागेल. यादरम्यान रशियानेही हमास नेता हानियाच्या हत्येचा निषेध केलाय.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलला धडा शिकवण्याची शपथ घेतली आहे. हानियाच्या हत्येचा बदला घेणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. कारण ते इराणच्या भूमीवर मारले गेले आहेत. असे ही ते म्हणाले आहेत. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी इस्माइल हनिया तेरहानला पोहोचला होता. पण तो ज्या खोलीत राहत होत्या. तेथे त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण आहे.
इस्रायल आणि इराण यांच्यातील तणवाच्या परिस्थितीमुळे जगभरातील इतर देश ही चिंतेत आहे. अनेक देशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. इस्रायलने देखील हमासला संपवण्याची शपथ घेतली होती. इस्रायलवर हमासने हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी हमासचा समुळ नष्ट करणार असल्याचं म्हटले होते. ते म्हणाले होते की, हे युद्ध तरी हमासने सुरु केले असले तरी याचा शेवट आम्ही करणार. त्यामुळे इस्माईल हनियाची हत्या केल्याचा आरोप इस्रायलवर होत आहे.