मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एका मोठ्या मंचावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच भरभरुन कौतुक केलं आहे. ईस्टर्न इकोनॉमिक फोरम (EEF) मंचावरुन ‘मेक इन इंडिया‘ प्रोग्रॅमला प्रोत्साहन देण्याच्या मोदींच्या धोरणाच कौतुक केलं. देशांतर्गत उत्पादनाचा महत्त्व अधोरेखित करताना मोदींच्या धोरणांची भरभरुन स्तुती केली. ते आठव्या इस्टर्न इकोनॉमिक फोरमला संबोधित करत होते. “तुम्हाला माहितीय, आधी आपण कार निर्मिती करत नव्हतो, पण आता कार उत्पादन सुरु केलय. मर्सिडीज आणि ऑडी या कार 1990 च्या दशकात आपण मोठ्या प्रमाणात विकत घेतल्या होत्या. त्या तुलनेत आपण बनवलेल्या कार खूप सामान्य आहेत. पण हा मुद्दा नाहीय” असं पुतिन म्हणाले.
“आपल्याला काही सहकाऱ्यांनी मार्ग दाखवलाय त्यावरुन चालण्याची गरज आहे. तुम्ही भारताचच उद्हारण घ्या. तिथले लोक भारतात कारच उत्पादन करुन त्या वापरण्यावर भर देत आहेत. मला वाटतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत बनलेल्या उत्पादनांच्या वापराला प्रोत्साहन देऊन अगदी योग्य ते करत आहेत. हेच योग्य आहे” असं पुतिन म्हणाले. ‘आपण सुद्धा रशियात बनवलेल्या कारचा वापर केला पाहिजे’ असं पुतिन यांनी सांगितलं.
कुठल्या देशांचा आर्थिक फायदा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 शिखर संम्मेलनादरम्यान भारत मध्य-पूर्व यूरोप आर्थिक कॉरिडोरची घोषणा केली होती. या कॉरिडोरमुळे भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि यूरोपियन युनियन हे देश आर्थिक सहकार्यासाठी परस्पराशी जोडले जातील. हा कॉरिडोर भारताला पश्चिम आशिया आणि युरोपशी जोडेल. कॉरिडोर भारत, मध्य-पूर्व आणि यूरोप दरम्यान आर्थिक सहकार्याचा एक मोठं माध्यम ठरेल. EEF च्या मंचावरुन पुतिन या कॉरिडोरबद्दल सुद्धा बोलले.
पुतिन यांची भूमिका चीनला झटका
IMEC रशियाला प्रभावित करणार नाही. उलट यामुळे फायदाच होईल. “IMEC मुळे रशियाला फायदाच होईल. यामुळे आपल्याला देशात लॉजिस्टिक्स विकसित करण्यात मदत होईल. या प्रोजेक्टवर आजच नाही, तर अनेक वर्षांपासून चर्चा होतेय” असं पुतिन यांनी सांगितलं. चीन देखील अशाच प्रकारचा कॉरिडोर विकसित करत आहे. पण आता भारताने स्वतंत्र कॉरिडोरची घोषणा केलीय. त्यामुळे चीनचा जळफळाट होण स्वाभाविक आहे. त्यात चीनचे जवळचे मित्र असलेले पुतिन यांनी IMEC च समर्थन केलय.