मुंबई : कोरोना संकट काळात (Corona) जगाला दिलासा देण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या रशियाच्या एका वैज्ञानिकाची गळा घोटून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित बातमी समोर आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीने जगाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले त्याच व्यक्तीची निर्घृणपणे हत्या कशी काय केली जाऊ शकते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. रशियाचे वैज्ञानिक आंद्रे बोतिकोव (Andrey Botikov) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय.
रशियाच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आंद्रे बोतिकोव यांची त्यांच्या राहत्या घरी गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी तपास करत एका संशयिताला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. पण आंद्रे बोतिकोव यांनी असं काय केलं होतं की ज्यामुळे त्यांची हत्या करण्यापर्यंत आरोपीची मजल गेली? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
संबंधित घटना ही गुरुवारी (2 मार्च) घडल्याची माहिती समोर आलीय. रशियाच्या ‘तास’ वृत्तसंस्थेने इन्वेस्टिगेटिव्ह कमेटी ऑफ रशिया फेडरेशनचा हवाला देत माहिती दिली. मृतक वैज्ञानिक हे गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अँड मॅथमेटिक्सचे ज्येष्ठ संशोधक म्हणून काम करायचे. ते 47 वर्षांचे होते. गुरुवारी त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला.
आंद्रे बोतिकोव यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या समितीने टेलिग्रामवर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल. आतापर्यंत करण्यात आलेल्या पोलीस तपासानुसार, एका 29 वर्षीय तरुणासोबत बोतिकाव यांचा वाद झाला. हा वाद पुढे जास्त चिघळला. त्यानंतर तरुणाने संतापात बोतिकोव यांचा बेल्टच्या सहाय्याने गळा घोटत हत्या केली. आरोपी तरुणाने बोतिकोव यांची हत्या केल्यानंतर तो घटनास्थळाहून फरार झालाय. पण पोलिसांनी संबंधित संशयित तरुणाला अटक केल्याची माहिती तपास करणाऱ्या समितीने दिली आहे.
कोरोना काळात स्पुतनिक लस निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी 2021 मध्ये आंद्रे बोतिकोव यांना पुरस्कार देवून सन्मानित केलं होतं. त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. स्पुतनिक लस बनवण्यासाठी 20 वैज्ञानिकांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली. आंद्रे बोतिकोव हे त्यापैकीच एक होते.