वॉशिंग्टन: भारत-अमेरिका संबंधांसाठी यापेक्षा महत्त्वाचा क्षण कधीच आला नव्हता, असं म्हणत अमेरिकेच्या एका खासदाराने भारताचं कौतुक केलं आहे. क्वाड देशांच्या बैठकीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौरा केला. या दौऱ्याच्या काही दिवसांतच अमेरिकन संसदेच्या एका सदस्याने हे विधान केलं आहे. ( us-india-relations-senator-chuck-schumer-says-its-a-great-time-for-two-countries china russia pakistan )
मोदींच्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्याचा शनिवारी समारोप झाला. पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 76 व्या सत्राला संबोधित केलं, पहिल्या क्वाड संमेलनात भाग घेतला आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन, उपराष्ट्रपती कमला हॅरिस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्यासोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठका घेतल्या.
काय म्हणाले काँग्रेसचे सदस्य?
यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमची परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत कॉंग्रेसचे सदस्य चक शूमर म्हणाले, “कदाचित भारत आणि अमेरिका यांच्यातील नातेसंबंधांसाठी आतापेक्षा अधिक महत्त्वाचा क्षण कधीच नसेल.” त्यांनी सांगितले की, जर आपण आपल्या सामान्य मूल्यांनुसार जगलो, आर्थिक वाढीच्या संधी निर्माण केल्या आणि सामायिक संरक्षण सुनिश्चित केले तर मला विश्वास आहे की, पृथ्वीवरील दोन सर्वात मोठ्या लोकशाहीच्या बळावर, पुढील पिढी खरोखर समृद्ध होईल. आपण अशा जगाचा आनंद घेऊ शकतो. मी वचन देतो की, ते ध्येय साध्य करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
या क्षेत्रांकडे लक्ष देण्याची गरज
चक शूमर म्हणाले की, न्यूयॉर्कमध्ये भारतीय-अमेरिकन लोकांचे रेकॉर्ड चांगले आहेत आणि हे लोक अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहेत. ते म्हणाले की हीच वेळ आहे, जेव्हा दोन्ही देशांनी समान संधी शोधल्या पाहिजे. ज्या अंतर्गत ते गुंतवणुकीला चालना देऊ शकतात. शूमर हे, सेमीकंडक्टर आणि बायोटेक सारख्या क्षेत्रांत गुंतवणुकीचा उल्लेख करत होते. चक शूमरच्या मते, भारत आणि अमेरिकेने आता 5G, सायबर सुरक्षा आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
जगभरात भारत-अमेरिकेचे शत्रू
चीनचं नाव न घेता, चक शूमर यांनी जगभरात भारत अमेरिकेसाठी असलेले धोके सांगितले. ते म्हणाले की, जगभरात लोकशाहीचे शत्रू आहे, या शत्रूंनी लोकशाहीचा कधीच आदर केला नाही. हे असे देश आहेत जे सध्या सायबर सुरक्षा आणि 5G सारख्या तंत्रज्ञानात वेगाने गुंतवणूक करत आहेत. ते म्हणाले की, या शत्रूंना कोणत्याही प्रकारे पराभूत करणं आवश्यक आहे. त्याचवेळी, अमेरिका आणि भारत दोघांनीही एकाच संरक्षण रणनितीवर एकत्र काम करण्याची गरज आहे.