एस जयशंकर इस्लामाबादमध्ये दाखल, भारताचे परराष्ट्र मंत्री 9 वर्षांनंतर पाकिस्तानात, कारण काय?

| Updated on: Oct 15, 2024 | 5:56 PM

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद 15-16 ऑक्टोबर रोजी इस्लामाबाद येथे पार पडत आहे. दहशतवादाचा मुकाबला, आर्थिक सहयोग आणि हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. त्यासाठी भारताकडून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे प्रतिनिधित्व करणार आहेत.

एस जयशंकर इस्लामाबादमध्ये दाखल, भारताचे परराष्ट्र मंत्री 9 वर्षांनंतर पाकिस्तानात, कारण काय?
Follow us on

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षात तणावाचे राहिले आहेत. भारताने किस्तानमधील दहशतवादाला उत्तर देण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन मोठा झटका दिला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार देखील बंद झाला होता. त्यातच आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे पाकिस्तानला पोहोचले आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेत सहभागी होण्यासाठी आज त्यांचं विमान राजधानी इस्लामाबादला पोहोचले. नूर खान एअरबेसवर पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एस जयशंकर यांचे स्वागत केले. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी आयोजित केलेल्या मेजवानीला एस जयशंकर हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

यंदा पाकिस्तानात आयोजन

15 आणि 16 ऑक्टोबर रोजी ही SCO शिखर परिषद होणार आहे. ज्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानला गेले आहेत. एस जयशंकर येथे 24 तासांपेक्षा कमी वेळ घालवतील. एस जयशंकर यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडल होते. ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर संबंध आणखी ताणले गेले. एका कार्यक्रमात जयशंकर म्हणाले होते की, ‘कोणत्याही शेजाऱ्याप्रमाणे भारतालाही पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवायला आवडतील. पण सीमेपलीकडून दहशतवाद सुरू राहिल्यास असे होऊ शकत नाही.

SCO मध्ये चीन, रशिया, बेलारूस, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचे पंतप्रधान तसेच इराणचे उपाध्यक्ष आणि भारताचे परराष्ट्र मंत्री सहभागी होणार आहेत. पाकिस्तान सरकारने इस्लामाबादमध्ये तीन दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर केली, सोमवारपासून शाळा आणि व्यवसाय बंद होते आणि पोलीस आणि निमलष्करी दलाच्या मोठ्या तुकड्या शहरभरात तैनात केल्या होत्या.

भारताचे परराष्ट्र मंत्री 9 वर्षांनंतर पाकिस्तानात

SCO शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री पाकिस्तानात पोहोचले आहेत. महत्त्वाचे म्हणजे नऊ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताचे परराष्ट्रमंत्री हे पाकिस्तानला भेट देण्यासाठी गेले आहेत. यापूर्वी डिसेंबर 2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला भेट दिली होती.

SCO म्हणजे काय?

एप्रिल 1996 मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांची एक बैठक झाली होती. जातीय आणि धार्मिक तणाव दूर करण्यासाठी ही बैठक होती. पण खऱ्या अर्थाने त्याची स्थापना 15 जून 2001 रोजी झाली. चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली. ज्यामध्ये व्यवसाय आणि गुंतवणूक वाढवण्यावरही भर देण्यात आला.

1996 मध्ये शांघाय फाइव्हची स्थापना झाली तेव्हा चीन आणि रशियाच्या सीमेवरील तणाव टाळण्यासाठी आणि त्या सीमा कशा सुधारता येतील हा त्याचा उद्देश होता. कारण त्यावेळी निर्माण झालेल्या नव्या देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अवघ्या तीन वर्षांत हे उद्दिष्ट साध्य झाले. त्यामुळे ती सर्वात प्रभावी संस्था मानली जाते.

SEO चे प्रतिनिधी

चीन
भारत
इराण
कझाकस्तान
किर्गिझस्तान
पाकिस्तान
रशिया
ताजिकिस्तान
उझबेकिस्तान
बेलारूस (जुलै 2024 मध्ये सामील झाले)