कराची | 5 डिसेंबर 2023 : खालिस्तांनी अतिरेकी लखबीर सिंग रोडे याचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. रोडे 72 वर्षाचा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. 2 डिसेंबर रोजीच त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तर, 2009मध्ये झालेल्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड साजिद मीरला विष पाजण्यात आलं आहे. त्यामुळे साजित मीर हा व्हेंटिलेटरवर आहे.
खालिस्तानी अतिरेकी लखबीर सिंग रोडे हा पाकिस्तानात लपला होता. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे 2 डिसेंबर रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. मृत्यूनंतर रोडेचा गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
लखबीर सिंग रोडे हा पाकिस्तानची गुप्तचर एजन्सी आयएसआयच्या इशाऱ्यावर भारताच्या विरोधात पंजाबमध्ये अतिरेकी कारवाया करत होता. लखबीर सिंग रोडे हा जनरल भिंडरावाले यांचा पुतण्या आहे. भारताने बंदी घातलेल्या खालिस्तान लिबरेशन फोर्स आणि इंटरनॅओशनल शीख यूथ फेडरेशनला तो पाकिस्तानातून ऑपरेट करत होता. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी तो काम करत असल्याचा त्याच्यावर आरोप होता. अतिरेकी कारवायात सामील झाल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्याने अमृतपाल सिंग याला त्याच्या गावात आश्रय दिला होता. एनआयएने पंजाबच्या मोगा येथील रोडे गावातील लखबीर सिंग रोडे याची जमीन सील केली होती. एनआयएने रोडेवर 2021मध्ये लुधियानातील कोर्टात ब्लास्ट करण्याच्या प्लानिंगचा आरोप केला होता.
2009मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड साजिद मीर व्हेंटिलेटरवर आहे. साजित मीर हा लष्कर एत तोयबाचा अतिरेकी आहे. पाकिस्तानच्या लाहोर येथील तुरुंगात तो होता. तुरुंगातच त्याला अज्ञात व्यक्तीने विष पाजल्याचं सांगितलं जातं. विष प्यायल्यानंतर त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली. त्यानंतर त्याला लाहोरच्या तुरुंगातून डेरा गाजी येथे आणण्यात आलं. त्यानंतर त्याला एअरलिफ्ट करून केंद्रीय सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
साजिद हा आयएसआयचा खास माणूस होता. त्याला तुरुंगात ठेवल्यानंतर व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली होती. त्याच्यासाठी खास जेवण बनवण्यासाठी एक स्वयंपाक्याही तैनात करण्यात आला होता. हा स्वयंपाक्या रोज त्याच्यासाठी जेवण तयार करायचा. हा स्वयंपाक्या रोज बाहेर जायचा आणि यायचा. मात्र, साजिद मीर व्हेंटिलेटरवर गेल्यापासून हा स्वयंपाक्या गायब आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था त्याचा कसून शोध घेत आहे. त्यानेच साजिदला विष दिल्याचं सांगितलं जात आहे.