मॉस्को: रशियन शास्त्रज्ञांनी सायबेरियाच्या पर्माफ्रॉस्ट बर्फातून तब्बल 48,500 वर्षे जुन्या व्हायरसला शोधून काढलंय. ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलामुळे बर्फ वेगाने वितळत असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या बर्फाखाली वर्षानुवर्षे दबलेले व्हायरस बाहेर येऊ शकतात. या व्हायरसचा संसर्ग अचानक पसरला तर त्याला मानवी जिवाला अधिक धोका असेल. म्हणूनच त्यांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी 13 नवीन व्हायरसना शोधून काढलं आहे. त्यापैकीच एक ‘झॉम्बी व्हायरस’ आहे.
या शास्त्रज्ञांनी विविध व्हायरसचे नमुने गोळा केले आहेत. यापैकी पँडोराव्हायरस हा 48,500 वर्षे जुना आहे. तर यातील तीन व्हायरस हे 30,000 वर्षे जुने आहेत. रशियातील युकेची अलास सरोवराच्या तळाशी शास्त्रज्ञांना पँडोराव्हायरस सापडला. तर इतर व्हायरस मॅमथच्या फर किंवा सायबेरियन लांडग्याच्या आतड्यांमध्ये सापडले आहेत.
‘झॉम्बी व्हायरस’चा अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलं की त्यात संसर्गजन्य असण्याची क्षमता आहे. त्यामुळे हा व्हायरस आरोग्यासाठी धोका ठरू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. इतकंच नव्हे तर भविष्यात कोविड-19 सारखे साथीचे रोग आणखी पसरू शकतात, कारण सतत वितळणाऱ्या पर्माफ्रॉस्टमधून सुप्त व्हायरस बाहेर पडत आहेत, असं मत त्यांनी मांडलं आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञ बऱ्याच काळापासून इशारा देत आहेत की सततच्या तापमानवाढीमुळे पर्माफ्रॉस्ट वितरळ आहे. त्यातून मिथेनसारखा वायू बाहेर पडल्याने भविष्यात हवामान बदल आणखी तीव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे.
प्रकाश, उष्णता, ऑक्सिजन आणि पर्यावरणातील इतर बाह्य घटकांच्या संपर्कात आल्यावर या अज्ञात व्हायरसच्या संसर्गाची तीव्रता किती असू शकते, यासाठी अधिक संशोधन करण्याचा आवश्यकता आहे.