हिज्बुल्लाहच्या टॉप कमांडर्सचा खात्मा केल्यानंतरही इस्रायलची लेबनानमधील कारवाई थांबलेली नाही. दररोज लेबनानच्या वेगवेगळ्या भागात इस्रायलकडून हवाई हल्ले सुरुच आहेत. कमांडर्सना संपवल्यानंतर हिज्बुल्लाहच समूळ नेटवर्क नष्ट करण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे. असं केल्यास उत्तर इस्रायल सुरक्षित होईल. कारण हिज्बुल्लाहकडून उत्तर इस्रायलवर हवाई हल्ले सुरु होते. आता इस्रायलकडून मध्य बेरुतच्या दोन वेगवेगळ्या भागात एअर स्ट्राइक करण्यात आले. या हवाई हल्ल्यात 18 जणांचा मृत्यू झाला असून 92 लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एका निवासी इमारतीच पूर्णपणे नुकसान झालं असून दुसरी इमारत कोसळली आहे, असं लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
लेबनानची राजधानी बेरुतमध्ये झालेल्या या हवाई हल्ल्याबद्दल इस्रायली सैन्याकडून कुठलीही टिप्पणी करण्यात आलेली नाही. इस्रायलने लेबनानमध्ये हिज्बुल्लाह विरोधात कारवाईचा वेग आणि अवाका दोन्ही वाढवला आहे. त्याशिवाय इस्रायलच लेबनानमध्ये ग्राऊंड ऑपरेशन सुरु आहे. पहिला हल्ला रास अल-नबा भागात झाला. आठ मजली इमारतीच्या खालच्या भागात स्फोट झाला. दुसरा हल्ला बुर्ज अबी हैदर क्षेत्रात झाला. इथे एक इमारत पूर्णपणे कोसळल्यानंतर त्या भागाला आगीच्या ज्वाळांनी वेढलं.
त्याला अजून इस्रायलने उत्तर दिलेलं नाही
गाजामध्ये सुद्धा इस्रायलची अशीच कारवाई सुरु आहे. गाजामध्ये विस्थापित लोकांना आश्रय देणाऱ्या एका शाळेवर गुरुवारी इस्रायलने हल्ला केला. यात 27 जणांचा मृत्यू झाला. पॅलेस्टाइनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. इस्रायलचे पॅलेस्टाइनचे वास्तव्य असलेल्या भागात असेच हल्ले सुरु आहेत. त्याचवेळी लेबनानमध्ये हिज्बुल्लाहविरोधात युद्ध देखील सुरु आहे. इराणबरोबरही मोठा तणाव आहे. इराणने केलेल्या बॅलेस्टिक मिसाइल हल्ल्याला अजून इस्रायलने उत्तर दिलेलं नाही.
शांती सैन्यावर हल्ला
दुसऱ्या एका घटनेबद्दल माहिती देताना संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकाऱ्याने सांगतिलं की, इस्रायलच्या लेबनानवरील हल्ल्यात दोन शांती सैनिक जखमी झालेत. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मीडियाशी बोलण्याची आपल्याला परवानगी नाही असं त्याने सांगितलं. अधिकाऱ्याने सांगितलं की, इस्रायली सैन्याने गुरुवारी दक्षिण लेबनानमध्ये शांती सैन्याच्या युनिफिलच्या तीन स्थानांवर गोळीबार केला.