माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी देश ही सोडावा लागला. यानंतर आता देशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं आहे. यादरम्यान शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय यांनी बांगलादेशातील हिंसाचार आणि सत्तापालट कशामुळे झाला याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, काही गट आंदोलकांना भडकवत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. आमच्या सरकारने दोन-तीन वर्षांपूर्वी आरक्षणाचा कोटा काढला होता, पण स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय न्यायालयात पोहोचले होते, त्यामुळे आंदोलने सुरू झाली. हा एक छोटासा निषेध होता, परंतु पाश्चात्य गटांनी त्यांना भडकवले. ज्यामुळे आंदोलन हिंसक झाले आणि माझ्या आईच्या सुरक्षिततेचा मुद्दा तयार झाला. आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढत होते. माझ्या आईला शेवटच्या क्षणीही देश सोडायचा नव्हता. ती मिलिटरी एअरबेसवर गेली तेव्हा ती तिच्या बहिणीला म्हणाली की तिला जायचे नाही, पण तू जर गेली नाही तर हे लोकं तिला मारतील असं सांगितल्यानंतर ती तयार झाली.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाश्चात्य गटांचा या आंदोलनामागे सहभाग असल्याचा संशय आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, चीनचा यात सहभाग आहे असे मला वाटत नाही, कारण तो कधीही आमच्या अंतर्गत बाबींमध्ये गुंतलेला नाही. आम्ही प्रत्येक देशाचे मित्र होतो. चीन आणि भारताशी आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही भारताला आमचा चांगला मित्र मानतो. अमेरिकेशीही आमचे चांगले संबंध होते, पण पाकिस्तान (ISI) नेहमीच बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या विरोधात राहिला आहे. आम्ही त्यांच्यापासून स्वातंत्र्यासाठी लढलो, म्हणून मला शंका आहे की विरोध भडकावण्यात आयएसआयचा हात होता.
आंदोलन शांततेत सुरू असताना या विद्यार्थ्यांकडे बंदुका कशा आणि कुठून आल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बंदुका हाती घेतल्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला. यानंतरही आमच्या सरकारने त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले, मात्र हा संपूर्ण प्रकार चिथावणी देण्यासाठी रचण्यात आला होता. निदर्शने वाढत गेली आणि त्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलकांनी बंदुकांसह पोलीस ठाण्यांवर हल्ला केला. त्यांच्याकडे बंदुका कुठून आल्या? हा मोठा प्रश्न आहे.