अंतराळवीर सुनीता विल्यम्स ही अंतराळात अडकली आहे. गेल्या दोन महिन्यापासून सुनीता अंतराळात आहे. तिला परत पृथ्वीवर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही वर्षभरानंतर सुनीता पृथ्वीवर येईल असं सांगितलं जात आहे. त्यातच सुनीताकडे असलेला ऑक्सिजनचा साठा केवळ तीन महिन्यांपुरताच असल्याचं उघड झाल्याने संपूर्ण जगाला सुनीताची चिंता लागली आहे. संपूर्ण जगाला सुनीताची चिंता लागलेली असतानाच तिच्या आईची प्रतिक्रिया आली आहे. सुनीताची आई बोनी पंड्या यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
माझी मुलगी सुरक्षित आहे, एवढीच माहिती मला देण्यात आली आहे. जोपर्यंत ती अंतराळात सुरक्षित आहे, तोपर्यंत मला या बातमीनं काळजी वाटत नाही, असं बोनी यांनी सांगितलं. सुनीताला अंतराळात पाठवण्यासाठी तीन प्रयत्न करण्यात आले. कारण लॉन्च करण्यात वारंवार उशीर होत होता, अशी माहितीही बोनी यांनी दिली.
सुनीताला परत आणण्यासाठी नासाने कोणतीही घाई केली नाही. तिच्या सुरक्षेला नासाने पहिलं प्राधान्य दिलंय. खरं सांगू का? नासाने तिला परत आणण्यासाठी घाई केली नाही याचं मला बरं वाटलं. आधीच्या दोन शटलची दुर्घटना झाली आहे. माझ्या मुलीसोबत असं व्हावं असं मला वाटत नाही. माझ्या मुलीच्याच काय कुणाच्याही सोबत असं होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळेच पश्चात्ताप करण्यापेक्षा सुरक्षित राहणं मला सर्वात महत्त्वाचं वाटतं, असं बोनी म्हणाल्या.
मला सुनीताची रोज आठवण येते. कारण ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. आम्ही एकत्र काही तरी करण्याची योजना आखली होती. पण मी या गोष्टी आता समजू शकते, असंही त्यांनी सांगितलं. ग्रहांना खाली पाहणं आणि तिथून सर्व काही पाहणं किती अद्भूत आहे हे मला सुनीता नेहमी सांगत असते, अशी आठवणही त्यांनी सांगितलं.
सुनीता विल्यम्स दोन महिन्यांपासून अंतराळात आहे. पण या वेळात त्यांचं महत्त्वाचं काम सुरू आहे. इतर अंतराळवीरांच्या साथीने सुनीता स्पेस स्टेशनमधील महत्त्वाची कामे मार्गी लावत आहे. स्पेस स्टेशनवर स्पेस वॉक आणि आयएसएसचं मेंटेन्स ठेवण्याचं काम ते करत आहेत. त्याशिवाय हार्डवेअरचंही निरीक्षण करण्यात येत आहे.