अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार अस्तित्वात आलंय. पण ह्या सरकारचा शपथविधीच झालेला नाही. कुठल्याही शपथविधीशिवाय सरकार चालवत असलेलं हे जगातलं एकमेव सरकार असावं. आधी चालू असलेल्या चर्चांनुसार 11 सप्टेबर म्हणजेच काल अखुंद सरकारचा शपथविधी पार पडणार होता. त्यासाठी पाकिस्तान, चीन, इराण, रशिया, कतार, अशा मोजक्या देशांना निमंत्रणही गेली होती. पण माशी शिंकली आणि हा शपथविधी सोहळाच पार पडला नाही. त्याचं कारणही आता समोर येतंय. (Taliban Latest News)
का झाला नाही शपथविधी सोहळा?
जागतिक दहशतवादी म्हणून यूएनच्या लिस्टमध्ये असलेला अखुंद हा अफगाणिस्तानचा पंतप्रधान झालाय. इतर खात्याचेही मंत्रीमंडळ वाटप झालेलं आहे. हक्कानीसारखा दहशतवादी ज्याच्या डोक्यावर 37 कोटी रुपयांचं अमेरीकेनं इनाम ठेवलेलं आहे तो गृहमंत्री झालाय. ह्या सगळ्या रथी महारथींचा भव्यदिव्य शपथविधी सोहळा करण्याची योजना आखली गेली होती. पण हा सोहळाच ऐन वेळेस रद्द करण्यात आल्याचं तालिबान सरकारकडून जाहीर करण्यात आलं. त्याला कारण आहे अफगाणिस्तानची सध्याची स्थिती. आर्थिक स्थिती. तालिबाननं अफगाणिस्तानची सत्ता काबीज करताच, जागतिक बँका, अमेरीका ह्या सर्वांनी अफगाणिस्तानची सगळी संपत्ती, पैसा गोठवून टाकलंय. त्यामुळे तालिबानकडे देश चालवण्यासाठी फुटकी कवडीही नाही. अशा परिस्थितीत शपथविधी सोहळा कसा करणार? सत्तेचही सोंग करता येईल पण पैशाचं कसं करणार? त्यामुळेच पैसा नसल्याने तालिबाननं शपथविधी सोहळाच गुंडाळला.
रशियाचा नकार
रशियानं तालिबान सरकारला मदत केलीय. गतवर्षीही तालिबानच्या नेत्यांनी मॉस्कोची पाहुणेगिरी अनुभवलीय. त्यामुळेच रशियाचा तालिबानला पाठिंबा असल्याचं जगजाहीर आहे. त्याचीच परतफेड म्हणून तालिबाननं शपथविधी सोहळ्यासाठी ज्या सहा देशांना निमंत्रीत केलं होतं, त्यात रशिया वरच्या स्थानावर होता. पण ब्रिक्स देशांच्या प्रमुखांची बैठक पार पडली, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही होते, आणि वातावरण बदललं. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी तालिबानवर भाष्य करत दहशतवादाशी त्यांना कनेक्ट केलं. त्याचाच परिणाम शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणावरही दिसला. कारण रशियाकडून कुठलाही मंत्री किंवा उच्चपदस्थ ह्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. राजदूतस्तरावरचा अधिकारी हजर राहील असं सांगितलं. पण शपथविधी सोहळाच पार पडला नाही त्यामुळे निमंत्रीतांनी हजर राहण्याचा प्रश्नच आला नाही.
पाकिस्तानची आर्थिक घुसखोरी
अफगाणिस्तानमध्ये आर्थिक दिवाळखोरीचं चित्रं आहे. सरकार सत्तेवर आलंय पण त्यांच्याकडे कुठलाही चलनसाठा नाही. राज्यकारभार कसा हाकायचा हा मोठा प्रश्न आहे. हीच संधी साधत अफगाणिस्तानमध्ये पाकिस्ताननं आर्थिक घुसखोरी केलीय. अफगाणिस्तानला पाकिस्तानी रुपयाचं चलन देऊन त्यांच्यासोबत त्याच चलनात व्यवहार करणार असल्याचं पाकिस्ताननं जाहीर केलंय. विशेष म्हणजे पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत अफगाण चलन हे मजबूत आहे. ह्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती आणखी खिळखिळी होऊ शकते. पाकिस्ताननं एक आर्थिक सल्लागारांची टीमही काबूलला पाठवायची तयारी केलीय. पण पाकिस्तानची लष्करी तसच आर्थिक घुसखोरी बघून अफगाणिस्तानध्ये असंतोष वाढतोय. लोक विशेषत: महिला ह्या रस्त्यावर उतरतायत.
11 सप्टेबरच का?
शपथविधीला फुटकी कवडी जरी नसली तरी तालिबानच्या अंगातली खाज काही कमी होताना दिसत नाहीय. कारण अमेरीकेला खिजवण्यासाठीच 11 सप्टेबर (9/11 attack on US) ही तारीख शपथविधीसाठी निवडण्यात आली होती. कारण याच दिवशी 20 वर्षापूर्वी दहशतवाद्यांनी अमेरीकेतल्या ट्विन टॉवर्सवर विमानं नेऊन धडकवली होती. हा तोपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीतच अमेरीकेनं अफगाणिस्तानमध्ये पाऊल ठेवलं होतं. नेमका तोच दिवस हेरून तालिबाननं शपथविधी सोहळा आयोजीत केला होता.
पुन्हा दुसऱ्या लढाईची वेळ आली
अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्याविरोधात फक्त जनताच नाही तर तालिबान नेतेही परेशान झाल्याचं दिसतंय. तालिबानच्याच एका नेत्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. त्यात तो ISI प्रमुख फैज हमीदमुळे(Pakistan ISI Chief Kabul Visit) अफगाणिस्तानचं भविष्य कसं वाटोळं झालंय यावर संताप व्यक्त करतोय. एवढच नाही तर आता दुसऱ्या लढाईची वेळ आल्याचही तो तालिबान नेता क्लिपमध्ये म्हणतोय. तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमध्ये फारसं जमून नाही. हक्कानी हे एक दहशतवादी नेटवर्क आहे जे पाकिस्ताननं पोसलेलं आहे. तालिबानच्या मंत्रीमंडळात हक्कानींना वजनदार खाते देण्यासाठीच आयएसआय प्रमुखानं तालिबानवर दबाव आणल्याचं उघड झालंय. त्यानंतरच सिराजुद्दीन हक्कानीला गृहमंत्री बनवलं गेलंय.
‘मला झोपेतून का उठवलं’ म्हणत वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की